लाडकी बहीण योजनेला अर्थ विभागाचाच विरोध? त्या कुजबुजीवर शिंदे गटाच्या खासदाराचं बेधडक भाष्य; म्हणाले "....तेव्हादेखील योजना चालूच राहणार"
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या एका खासदारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
नवी दिल्ली : सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा चालू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील महिला मोठ्या संख्येने अर्ज करत आहेत. आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे. दुसरीकडे या योजनेच्या अंमलबजावणीवर विरोधक टीका करत आहेत. अर्थ विभागाचा या योजनेवर आक्षेप आहे. कर्जाचा बोजा आठ लाख कोटी रुपये असताना ही योजना कशी राबवायची, असं अर्थ विभागाचं मत असल्याचा आरोप केला जातोय. यावरच आता शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घेतलेल्या निर्णयाशी सरकार कटिबद्ध आहे, असे माने म्हणाले. ते नवी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.
धैर्यशील माने नेमकं काय म्हणाले?
"ही एक तांत्रिक गोष्ट असते. घेतलेल्या निर्णयाशी सरकार कटिबद्ध आहे. बहिणींच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झालीय. ही आमच्या शाशनकाळातील योजना आहे. आमचे सरकार जेव्हा येईल, तेव्हादेखील आम्ही ही योजना चालू ठेवणार आहोत. जे विरोध करत आहेत तेच लोक महिलांचे जास्त अर्ज भरून घेत आहेत. आतापर्यंत 1 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत. एखाद्या योजनेसाठी अर्ज भरण्याचा हा उच्चांकी आकडा आहे," असे धैर्यशील माने म्हणाले.
महाराष्ट्राला बिहारपेक्षा जास्त निधी मिळाला
केंद्र सरकारे नुकतेच सादर केलेल्या अर्थसंकल्पावरही त्यांनी भाष्य केलंय. "तीन दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर झाला आहे. महाराष्ट्राला काय मिळालं याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांनी दिली आहे. विविध योजनांसाठी महाराष्ट्राला भरघोस निधी मिळाला आहे. केंद्राने वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटी रुपये दिले. गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्राला 10 लाख 5 हजार कोटींचा निधी उपलब्ध झाला, असे धैर्यशील माने म्हणाले. पूरग्रस्त भागासाठी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून 3200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बिहारपेक्षा जास्त रक्कम राज्याला मिळाली आहे," असा दावा धैर्यशील माने यांनी केला.
अर्थमंत्र्यांना भेटून पुराची माहिती दिली
सध्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना महापुराची भीती आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यावरही धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली. "कालच आमची पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली. अलमट्टी धरणाच्या विसर्गवर दोन्ही राज्यांची समिती स्थापन होणार आहे. येणाऱ्या काळात पूर उद्भवू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी आज मतदारसंघात जाऊन लागेल ती मदत करणार आहे. पुरासाठी मी लोकसभेत आवाज उठवला आहे. मी काल अर्थमंत्र्यांची भेट घेऊन पुराबाबत माहिती दिली," असे माने यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी मिळून पंतप्रधानांची भेट घेऊन पुरासाठी वाढीव निधी देण्याची मागणी करण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
1 कोटी 13 लाख महिलांनी भरला अर्ज
दरम्यान, राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेबाबत महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या योजनेसाठी 1 कोटी 13 लाख 91 हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
हेही वाचा :