Work From Home : कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर कुणी संकटाच्या काळात संधी शोधली.  अशाच संधीचा गैरफायदा बंगळुरुमधील एका आयटी कर्मचाऱ्यानं घेतला आहे.  जवळपास 90  टक्के भारत वर्क फ्रॉम होम काम करत होता आणि त्याच वेळी बंगळुरुतील एक आयटी कर्मचारी सात कंपन्यांमध्ये एकाच वेळी काम करत होता. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यावरुन हे उघड झालं.


वर्क फ्रॉम होमचा उपयोग करून बंगळुरुमधील  एक आय टी कर्मचारी एक दोन नव्हे तर चक्क सात कंपन्यांनसाठी काम करत असल्याचं उघड झालंय. या आय टी कर्मचाऱ्याच्या पी एफ अकाउंटमध्ये सात कंपन्यांकडून पैसे जमा होत होते. सातपैकी एका कंपनीच्या मॅनेजरने या आय टी कर्मचाऱ्याची चोरी पी एफच्या माध्यमातून पकडल्यावर हा प्रकार उघड झाला आहे. आय टी सेक्टरमध्ये अशाप्रकारे एकाहून अधिक कंपन्यांसाठी काम करण्याला मुन लाइटिंग म्हटलं जातं. वेगवगेळ्या आय टी कंपन्यांच्या प्रोजेक्टचे स्वरूप आणि कामाच्या वेळा वेगवगेळ्या असतात.  त्यामुळे असं करणं शक्य आहे असं आय टी तज्ज्ञांचं म्हणणे आहे. आय टी कंपन्यांची शिक्षण संस्था असलेल्या न्यासकॉमने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. न्यासकॉमचे विभगागीय सचिव धर्मेंद्र कपूर यांनी त्यांच्याकडे अशी तक्रार आल्याचं मान्य केलं आहे. 


बंगळुरुमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानं आय टी कंपन्या सतर्क झाल्या आहेत. आय टी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी असं मुनलाइटनिंग बेकायदेशीर आहे असं जाहीर केल आहे . मात्र असे एखादे दुसरे प्रकार उघडकीस आले तरी आय टी कर्मचाऱ्यांना सरसकट असं मुनलाइटनिंग करणं अवघड आहे असं त्यांचं म्हणणे आहे.


 खरं तर कर्मचाऱ्यांच्या वर्क फ्रॉम होममुळं आय टी कर्मचाऱ्यांच्या खर्चात मोठी घट झाली आहे . ऑफिस , ट्रान्सपोर्टेशन , वीज बिल असे सगळेच खर्च वाचत असल्यानं कोरोनाची लाट ओसरू लागल्यावर देखील अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम अजूनही सुरु ठेवलं आहे . पण असे मुनलाइटनिंगचे प्रकार समोर येत असतील तर कंपन्यांना वर्क फ्रॉम होम सुरु ठेवायचं का याचा विचार करावा लागणार आहे . मात्र एकाच कंपनीच्या कामाच्या ओझ्याखाली दबून गेलेले कर्मचारी अशाप्रकारे एकाहून अधिक कंपन्यांचे काम करणं अवघड आहे असं आय टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. आय टी कर्मचाऱ्यांना पुन्हा कंपन्यांमध्ये बोलावण्यासाठी हा खोटा प्रचार सुरु असल्याचा आरोप आय टी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून होत आहे.


आय टी सेक्टरमधील अरुंधती भट्टाचार्या मात्र या मुनलाइटनिंगला चुकीचं मानत नाहीत . त्यांच्यामते आय टी सेक्टरमध्ये विकसित झालेलं हायब्रीड वर्क कल्चर आणखी विकसित होण्याची गरज आहे. आय टी कंपन्यांनी पूर्णवेळ कर्मचारी नेमण्याऐवजी पार्ट टाइम कर्मचारी नेमल्यास त्यांचाही फायदा होईल आणि कर्मचाऱ्यांनाही निवड करण्याची संधी मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे.


 कोरोना आणि सोबत आलेल्या निर्बंधांमुळे आय टी सेक्टरमधे हायब्रीड वर्क कल्चर  वाढीस लागलं आहे. पण या वर्क फ्रॉम होमचा गैरफायदा घेऊन एकाचवेळी, एकाहून अधिक कंपन्यांसाठी काम केलं जात असेल आणि त्याचा परिणाम कामाच्या दर्जावर , प्रॉडक्टिव्हिटीवर होत असेल तर आय टी कंपन्या याचा विचार नक्कीच करतील.  पण मोठ्या प्रमाणात असं कारण अवघड आहे हे देखील हे आय टी क्षेत्र जाणून आहे . त्यामुळे नवीन वर्क कल्चर हे क्षेत्र लवकरच स्वीकारेलय  कारण काळानुरूप होणारे बदल स्वीकारणारे , त्यासाठी प्रचंड लवचिकता दाखवणारं क्षेत्र म्हणून आय टी सेक्टरची ओळख आहे.


संबंधित बातम्या :