मोनोरेल सेवा तात्पुरती स्थगित, मुंबईकरांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळणार, नेमक्या काय होणार सुधारणा?
मुंबई मोनोरेल प्रणाली अधिक सक्षम व आधुनिक करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. मोनोरेल सेवा 20 सप्टेंबर 2025 पासून तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
Mumbai Monorail News : मुंबई मोनोरेल प्रणाली अधिक सक्षम व आधुनिक करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने मोनोरेल सेवा 20 सप्टेंबर 2025 पासून तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याची घोषणा केली आहे. या नियोजित ब्लॉकमुळे नवीन रेक्सचे एकत्रीकरण, प्रगत CBTC सिग्नलिंग यंत्रणा बसवणे, व सध्याच्या रेक्सचे नुतनीकरण हे अधिक वेगाने करता येणार आहे. ज्यामुळे मुंबईकरांना अधिक सुरक्षित, सुरळीत व विश्वासार्ह सेवा मिळणार आहे.
प्रमुख सुधारणा सुरू आहेत. जागतिक दर्जाची सिग्नलिंग प्रणालीचे काम सुरु आहे. हैदराबादमध्ये स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आलेली Communication Based Train Control (CBTC) प्रणाली, पहिल्यांदाच मुंबई मोनोरेलमध्ये बसवली जात आहे. 32 ठिकाणी 5 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग्ज बसवण्यात आले असून सध्या चाचण्या सुरू आहेत. 260 Wi-Fi अॅक्सेस पॉईंट्स, 500 RFID टॅग्स, 90 ट्रेन डिटेक्शन सिस्टीम्स आणि अनेक WATC युनिट्स बसवण्यात आले आहेत. तसेच वेसाईड सिग्नलिंगचे काम पूर्ण झाले आहे. एकत्रित चाचण्या सुरू आहेत. ही अत्याधुनिक प्रणाली सुरक्षितता वाढवेल, ट्रेन अंतर कमी करेल आणि सेवा अधिक विश्वासार्ह बनवेल. तसेच रोलिंग स्टॉक आधुनिकीकरण MMRDA ने M/s MEDHA व SMH Rail यांच्या सहकार्याने "मेक इन इंडिया" उपक्रमांतर्गत 10 नवीन रेक्स खरेदी केल्या आहेत. तसेच 8 रेक्स वितरित करण्यात आल्या आहेत.9 वा रेक तपासणीसाठी सादर करण्यात आला आहे. 10 वा रेक अंतिम असेंब्लीमध्ये आहे.
सेवा स्थगिती का आवश्यक आहे?
सध्या मोनोरेल सेवा दररोज सकाळी 6.15 ते रात्री 11.30 या वेळेत सुरू असते. त्यामुळे फक्त 3.5 तासच रात्री उरतात, ज्यात इन्स्टॉलेशन व चाचणीचे काम करता येते. यामुळे प्रगती संथ गतीने होते, कारण दररोज सेवा सुरू होण्यापूर्वी सुरक्षा कारणास्तव पॉवर रेल बंद, डिसचार्ज आणि पुन्हा चार्ज करावी लागते. नवीन रेक्स व सिग्नलिंग प्रणालींचे इन्स्टॉलेशन, कमिशनिंग आणि चाचण्या अखंडितपणे होऊ शकतील. जुन्या रेक्सचे संपूर्ण ओव्हरहॉल व रीट्रोफिटमेंट करता येईल, ज्यामुळे तांत्रिक बिघाड टाळता येतील. येणाऱ्या मेट्रो प्रकल्पांसाठी मनुष्यबळ प्रशिक्षण व पुनर्नियोजन करता येईल.
अलीकडील आठवड्यांत तांत्रिक अडचणींमुळे सेवा प्रभावित झाली होती. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी MMRDA ने एक समिती नेमली असून, सेवा दीर्घकालीन विश्वासार्हतेसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने, चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान दोन्ही मार्गांवरील मोनोरेल सेवा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित राहील. नागरिकांनी प्रवासाची योजना तशी आखावी.या कालावधीत जुन्या रेक्सचे रीट्रोफिटमेंट देखील करण्यात येणार आहे, जेणेकरून त्या सेवा पुन्हा सुरू करताना तांत्रिक बिघाड न येता कार्यक्षम राहतील.
नागरिकांना अधिक सुरक्षित व विश्वासार्ह सेवा मिळणार
MMRDA च्या मते ही सेवा स्थगिती म्हणजे विश्रांती नाही, तर भविष्याभिमुख व सुरक्षित, जलद, आणि अधिक कार्यक्षम मोनोरेल सेवा देण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे. सुधारित प्रणाली सेवा विश्वासार्हतेत सुधारणा करेल आणि मुंबईच्या पूर्व विभागात सार्वजनिक वाहतूक एकत्रिकरण अधिक मजबूत करेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मोनोरेलमधील हा ब्लॉक हा मुंबईच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये बळकटी आणण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन रेक्स, प्रगत CBTC सिग्नलिंग व सध्याच्या रेक्सचे नुतनीकरण यामुळे नागरिकांसाठी अधिक सुरक्षित व विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. हे काम गतीने व अचूकतेने पूर्ण करण्यासाठी हा छोटा ब्लॉक आवश्यक आहे. मुंबईकरांच्या सहकार्याने, आपण मोनोरेल अधिक सक्षम रूपात पुन्हा सुरू करु अशी माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. ही तात्पुरती सेवा स्थगिती म्हणजे मोनोरेलला नवसंजीवनी देण्याचे काळजीपूर्वक नियोजन आहे. नवीन रेक्स समाविष्ट करून, प्रगत CBTC सिग्नलिंग बसवून आणि विद्यमान रेक्सचे नुतनीकरण करून, आपण ही प्रणाली अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यसिद्ध करत आहोत. नागरिकांच्या संयमाची आम्ही कदर करतो व खात्री देतो की मोनोरेल जेव्हा परत येईल, तेव्हा ती अधिक सक्षम, विश्वसनीय व मुंबईला उत्तम सेवा देण्यासाठी तयार असेल.



















