अवघ्या चार मिनिटात मोबाईल चोराला बेड्या
शेख शब्बीरने झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरल्याचं कृत्य आरपीएफच्या तीन जवानांनी सीसीटीव्हीमध्ये पाहिले.
नागपूर : नागपूर रेल्वे स्टेशनमध्ये चोरीच्या घटनेनंतर अवघ्या चार मिनिटात चोराला बेड्या ठोकण्याची किमया रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी करून दाखविली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनच्या संत्रा बाजारजवळील तिकिट खिडकीजवळ चोराने एका प्रवाशाच्या महगड्या मोबाईलवर डल्ला मारला होता. त्यानंतर अवघ्या चार मिनिटात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने चोराला अटक केली.
नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात फिरणाऱ्या शेख शब्बीर शेख बब्बू नावाच्या भुरट्या चोराची जवळच झोपलेल्या प्रवाशाच्या महागड्या मोबाईलवर नजर पडली. त्यानंतर चोराने काही क्षणात हळूच प्रवाशाच्या खिशातून मोबाईल काढला आणि तेथून पळ काढला.
मात्र, शेख शब्बीरचे हे कृत्य तिथे लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. नागपूर रेल्वे स्टेशनवर आधुनिक यंत्रणा म्हणजेच इंटिग्रेटेड सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सिस्टम लावण्यात आली आहे. त्यावर आरपीएफचे काही जवान सतत नजर ठेऊन स्टेशन परिसरातील हालचाली टिपत असतात. शेख शब्बीरने झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरल्याचं कृत्य आरपीएफच्या तीन जवानांनी सीसीटीव्हीमध्ये पाहिले.
त्यानंतर दोन आरपीएफ जवानांनी तातडीने घटनस्थळी धाव घेतली. तर एकाने कार्यालयात बसून सीसीटीव्हीवरून शेख शब्बीरवर नजर ठेवली. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात लागलेल्या अनेक सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या चार मिनिटात पाठलाग करणारे दोघे आरपीएफ जवान शेख शब्बीर जवळ पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतलं. शेख शब्बीरकडून चोरीचा मोबाईलही जप्त केला.
संबंधित प्रवाशाला आरपीएफच्या कार्यालयात बोलावून चोरीचा मोबाईल परत करण्यात आला. अशारितीने आधुनिक यंत्रणेचा पोलिसांनी योग्य वापर करत चोरीच्या घटना टाळली.