पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी, मंदिर समितीचा निर्णय
विठ्ठल मंदिरात अनेक भाविक फोटो काढतात, असं कारण देत ही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. मात्र मंदिर परिसरात मोबाईल लॉकरच्या मार्गाने पैसे उकळले जाण्याचा प्रकार पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
पंढरपूर : विठ्ठल मंदिरात 1 जानेवारीपासून भाविकांना मोबाईल नेण्यास बंदीचा वादग्रस्त निर्णय मंदिर समितीने आजच्या बैठकीत घेत पुन्हा नव्या वादाला तोंड फोडलं आहे. भाविकांच्या रेट्यानंतर मंदिरात मोबाईल नेण्यास यापूर्वी शासनाने परवानगी दिली होती. मात्र आज पुन्हा मंदिर समितीने मोबाईल बंदीचा निर्णय घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
मोबाईल ही आजची गरज असल्याने वयस्कर भाविक आपल्यासोबत मोबाईल ठेवत असतात. मंदिर समितीने पूर्वी सुरक्षेच्या कारणावरुन मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेतल्यावर मंदिर परिसरात मोबाईल लॉकरच्या नावाने पैसे काढायचे धंदे सुरु झाले होते. यात अनेक गैरप्रकारामुळे भोळ्या-भाबड्या भाविकांना फसवणुकीचा धंधा तेजीत सुरु झाला होता. याविरोधात वारकरी संप्रदाय आणि भाविकांनी आवाज उठवल्यावर मंदिरातील मोबाईल बंदी उठवण्यात आली होती.
आज पुन्हा मंदिरात मोबाईल बंदी करुन मंदिर समितीने मोबाईल लॉकरचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना खुश केलं आहे. विठ्ठल मंदिरात अनेक भाविक फोटो काढतात, असं कारण देत ही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. मात्र याचा थेट फटका सर्वसामान्य भाविकांना बसणार आहे.
या मोबाईल बंदीमुळे वयस्कर भाविकांच्या त्रासात भर पडणार आहे. मोबाईल ठेवण्यासाठी पुन्हा पैसे मोजावे लागणार आहे. तर आपल्या माणसांना शोधण्यासाठीही वेळ घालवावा लागणार आहे. राज्यात सरकार बदलल्याने आता पुन्हा लवकरच नवीन मंदिर समिती अस्तित्वात येणार असताना या जुन्या समितीने असा वादग्रस्त निर्णय का घेतला, असा सवाल भाविकांना पडला आहे. पूर्वीप्रमाणे आताही मंदिर समितीचे कर्मचारी आणि येणाऱ्या व्हीआयपी मंडळींना सोयीस्करपणे सवलत मिळणार हे मात्र नक्की आहे.