पदांच्या मोहात न पडण्याचा अहमद पटेलांचा गुण दुर्मिळ : राज ठाकरे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनानं निधन झालं असून ते 71 वर्षांचे होते. अहमद पटेल यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनानं निधन झालं असून गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 71 वर्षांचे होते. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून अहमद पटेल यांची ओळख होती. साधारणतः महिन्याभरापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अखेर मृत्यूशी असलेला त्यांचा लढा अपयशी ठरला असून पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा फैजल अहमद यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. अहमद पटेल यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
#AhmedPatel pic.twitter.com/TDaST9mqiY
— Raj Thackeray (@RajThackeray) November 25, 2020
राज ठाकरे म्हणाले की, "काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल ह्यांचं कोरोनानं निधन झांल. अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहिर होते, पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की, त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे. 43 वर्ष सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतःच्या सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली"
मुलगा फैजल पटेल यांची ट्विटरवरून अहमद पटेल यांच्या निधनासंदर्भात माहिती
अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्वीट करत सांगितलं की, 'वडील अहमद पटेल यांचं आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी निधन झालं आहे. एका महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान एकाच वेळी त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं, त्यांनंतर त्यांच्या शरीराचे अनेक अवयव निकामी होत गेले आणि त्याची प्रकृती आणखी खालावली. आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, कोरोनाच्या गाइडलाइन्सचं पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.'
महत्त्वाच्या बातम्या :