(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खातेवाटपाचा तिढा सुटला, मुख्यमंत्री उद्या निर्णय घेतील, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा
महाविकास आघाडीने (शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस) राज्यात सत्ता स्थापन करुन एक महिना सहा दिवस उलटले आहेत. आतापर्यंत 43 नेत्यांनी मंत्रीपदांची शपथ घेतली आहे. परंतु मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही.
मुंबई : महाविकास आघाडीने (शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस) राज्यात सत्ता स्थापन करुन एक महिना सहा दिवस उलटले आहेत. आतापर्यंत 43 नेत्यांनी मंत्रीपदांची शपथ घेतली आहे. परंतु मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही. तिन्ही पक्षांमध्ये मलाईदार मंत्रीपदं स्वतःकडे खेचण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. तर पक्षांच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रीपदांमधील महत्त्वाची खाती स्वतःकडे घेण्यासाठी प्रत्येक पक्षातील आमदारांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष महाविकास आघाडीवर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले की, खातेवाटपासाठी आघाडीतील पक्षांकडून उशीर होत आहे.
आज संध्याकाळी पुरातन बंगल्यावर माहाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. तब्बल चार तास खलबतं केल्यानंतर रात्री 11 वाजता सर्व नेते बाहेर पडले. त्यानंतर तिन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, खातेवाटपाबाबतचे सर्व निर्णय झाले आहेत. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याबाबत अंतिम निर्णय घेतील.
बैठकीनंतर बाहेर पडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, खातेवाटपासंबधी अंतिम चर्चा झाली आहे. चर्चा ही समाधानकारक होती. 95 टक्के मंत्रीपदं आणि पालकमंत्रीपदांबाबत आमचा निर्णय झाला आहे. उर्वरीत पाच टक्के कामकाज बाकी आहे. आज बैठकीत जो निर्णय झाला आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अंतिम निर्णय घेतील.
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत आमची समाधानकारक चर्चा झाली आहे. खातेवाटप आणि पालकमंत्रीपदांच्या वाटपासंदर्भात आमची चर्चा पूर्ण झाली आहे. त्याची यादी तयार करुन उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली जाईल. मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील.
दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनीदेखील सारखीच माहिती दिली. दोघांनीही सांगितले की, काँग्रेसकडून सर्व प्रश्न मिटले आहेत. तसेच महाविकास आघाडीची चर्चादेखील संपली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचं म्हणणं सांगितलं आहे. ते त्यावर उद्या निर्णय घेतील.