पुण्यातील पीडित मराठा कुटुंबीयांचं सांत्वन, मंत्री तानाजी सावंत भावूक; देठे कुटुंबीयांस आर्थिक मदत
बीड लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या.
![पुण्यातील पीडित मराठा कुटुंबीयांचं सांत्वन, मंत्री तानाजी सावंत भावूक; देठे कुटुंबीयांस आर्थिक मदत Minister Tanaji sawant Consoling the victimized Maratha families in Pune, Tanaji Sawant emotional and Financial assistance to prasad Dethe families पुण्यातील पीडित मराठा कुटुंबीयांचं सांत्वन, मंत्री तानाजी सावंत भावूक; देठे कुटुंबीयांस आर्थिक मदत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/a06c351dc39d50064772f35e45e8778e17189650849481002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण (OBC Reservation) हा सर्वात कळीचा मुद्दा बनला असून दोन समाज एकमेकांविरुद्ध रस्त्यावर उतरत असल्याचे दिसून आले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आरक्षणाची मागणी लावून धरली असून सगे सोयरे आणि ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. दुसरीकडे ओबीसी समाजानेही आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असे म्हणत लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात उपोषण सुरू आहे. त्यामुळे, मराठा (Maratha) तरुणही मनोज जरांगेंच्या पाठिशी उभे ठाकले असून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही, अशी घोषणाबाजी करत जीव पणाला लावत आहेत. प्रसाद देठे या मराठा आंदोलक कार्यकर्त्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. आज राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी प्रसाद देठे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
बीड लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या. या घटना ताज्या असतानाच फेसबुक लाईव्हमध्ये, मी आत्महत्या केल्यास पंकजा मुंडे माझ्या घरी भेट देतील का, असे म्हणत प्रसाद देठे यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचचले. मूळचे बार्शीतील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. बुधवारी सकाळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत प्रसाद देठे यांनी आपल्या मनातील व्यथाही मांडली होती.त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत 'फक्त मराठा आरक्षण मिळावे', याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे.त्यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर बार्शीतील त्यांच्या मित्रपरिवाराने व मराठा समाजातील बांधवांनी हळहळ व्यक्त केली. बार्शीचे आमदार, धाराशिवच्या खासदारांनीही मराठा युवकांना आवाहन करत, असे टोकाचे पाऊल कुणीही उचलू नये, अशी विनंती केली. त्यानंतर, आज मंत्री तानाजी सावंत यांनी देठे कुटुंबीयांची भेट घेतली.
मूळचे बार्शीतील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते.त्यामुळे, त्यांचे कुटुंबही पुण्यातच वास्तव्यास आहे. पुण्याच्या वाघोली परिसरात राहणाऱ्या व मूळ बार्शी तालुक्यातील असलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबाला तानाजी सावंत यांनी सांत्वन पर भेट दिली. यावेळी, सावंत यांच्याकडून देठे कुटुंबास 5 लाख रुपयांचा धनादेश देत आर्थिक मदत करण्यात आली. दरम्यान, या भेटीवेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. देठे कुटुंबातील तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलत तिन्ही मुलांचे पालकत्व स्वीकारल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले. तसेच, मराठा समाजातील तरुणांनी अशी टोकाची भूमिका न घेता कुटुंबाकडे लक्ष द्या, अशा घटनेमुळे कुटुंब उघड्यावर पडतात असे देखील तानाजी सावंत यांनी यावेळी म्हटले.
देठे सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकायचे. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करुन मराठा आरक्षणाची भूमिका हिरीरिने मांडली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. जरांगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे , आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील, असे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)