महाराष्ट्रातील व्यक्तीचं हृदय कर्नाटकातील तरुणाला; सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मानवतेचा संदेश
कर्नाटक आणि महाराष्ट्रात सीमावादामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. मात्र, अशा स्थितीत महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या हृदयामुळे कर्नाटकातील एका तरुणाचे प्राण वाचले आहेत.
बेळगाव : केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या कोल्हापूर येथील रुग्ण ब्रेन डेड झाल्यानंतर त्याच्या हृदयाचे रोपण बेळगाव जवळील काकती येथील सतरा वर्षीय तरुणावर करण्यात आले. कर्नाटक-महाराष्ट्र दोन्ही राज्यात सिमा वाद आणि लाल पिवळ्या कन्नड ध्वजामुळे वातावरण तणावपूर्ण असताना महाराष्ट्रातील व्यक्तीचे हृदय कर्नाटकातील व्यक्तीला देण्यात आले. भाषावाद असला तरी मानवता श्रेष्ठ आहे, हेच या उदाहरणावरून दिसून आले आहे, अशी माहिती केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार
कोल्हापूर येथील 52 वर्षीय व्यक्ती केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. त्यांचा ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कोल्हापूरच्या व्यक्तीची केस हाताळणाऱ्या डॉ. व्ही. ए. कोठी वाले यांनी ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून त्यांना हृदयदान करण्यासाठी प्रवृत्त केले. 26 फेब्रुवारी रोजी हृदय रोपणाची शस्त्रक्रिया सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत शस्त्रक्रिया झाली. काकती येथील प्रवीण नायक या सतरा वर्षांच्या तरुणावर हृदय रोपण करण्यात आले. पत्रकार परिषदेच्यावेळी प्रवीण याने आयसीयू मधून आपल्या बेड वरून थेट प्रक्षेपणाद्वारे पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला, दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद
हृदयरोपण झाल्यानंतर प्रवीणचा माध्यमांशी संवाद
मला सतत खोकला येत होता. काही पावले चालली की धाप लागत होती. भूक लागत नव्हती. पण, हृदयरोपण झाल्यानंतर मला बरे वाटत आहे, असे प्रवीण याने सांगितले. केएलई हॉस्पिटलचे प्रमुख कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. रिचर्ड सालढाणा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही हृदय रोपणाची शस्त्रक्रिया केली. पत्रकार परिषदेला हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. रिचर्ड सालढाणा, डॉ. व्ही. ए. कोठीवाले आदी उपस्थित होते. दरम्यान, दोन्ही राज्यात सीमेवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना सकारात्मक समजली जात आहे.