नारायण राणेंना मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार राहिला नाही, वैभव नाईकांचा हल्लाबोल
Vaibhav Naik : केंद्रीय मंत्री झाल्यापासून गेल्या वर्षभरात नारायण राणेंनी शिवसेनेला संपवणार अशा वलग्ना केल्या होत्या. शिवसेनेचे ते काहीही करू शकले नाहीत. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत.
Vaibhav Naik on Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केलेल्या आरोपाला शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांनी नारायण राणे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. यातच आता शिवसेना नेते वैभव नाईक यांनीही नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना हा मराठी माणसासाठीच पक्ष आहे. आज नारायण राणे कुणाची चापलुसगीरी करत आहेत? किरीट सोमय्यासारख्या मराठाद्वेषीची ते बाजू घेत आहेत. लोढांसारख्या मुंबईतल्या माणसाची राणे बाजू घेता आहेत. त्यामुळे नारायण राणेंना मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार राहिला नाही, असा हल्लाबोल वैभव नाईक यांनी केला आहे. ते मालवण येथे बोलत होते.
यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, 'केंद्रीय मंत्री झाल्यापासून गेल्या वर्षभरात नारायण राणेंनी शिवसेनेला संपवणार अशा वलग्ना केल्या होत्या. शिवसेनेचे ते काहीही करू शकले नाहीत. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेवर आरोप करत आहेत. नारायण राणेंचा बंगला योग्य पध्दतीने असेल तर कारवाई होणार नाही. बीएमसीची कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. '
फुकटची धमकी देऊ नका -
संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना अटक होऊन पोलीस कोठडी झाली. त्यामुळे राणे वैफल्यग्रस्त झाले आहेत. सुशांतसिंग प्रकरणात सीबीआयने राणेंना बोलवून घ्यायला हवं. जर त्यांच्याकडे पुरावे असतील ते घेऊन सीबीआयने कारवाई करावी. नारायण राणे दिल्लीत असतात. त्यांनी सीबीआय कार्यलयात जाऊन नावं द्यावीत. नारायण राणेंकडे जर कुणाचे कारनामे असतील तर त्यांनी बाहेर काढावेत. फुकटच्या वलग्ना करू नयेत. फुकटची धमकी देऊ नका. शुक्रवारी राणेंनी सांगितलं, ईडीची नोटीस येणार आहे. आज नोटीस कुठे गेली? आज दुसराच विषय त्यांनी घेतला. लोकांमध्ये चर्चेत येण्यासाठी राणे काहीतरी आरोप करत आहेत, असे वैभव नाईक म्हणाले.
राणेंना मर्डर बद्दल जास्त माहिती -
नारायण राणे यांच्या आरोपाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष देण्याची गरज नाही. अशा आरोपांकडे शिवसेनाही लक्ष देणार नाही. नितेश राणे हे कलाकार आहेत की आरोपी? हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे. त्यामुळे यानंतर योग्य असेल ती कारवाई त्यांच्यावर सरकारने करावी. राणेंनी मर्डर बद्दल अनेक दाखले दिले, त्यांना मर्डर बद्दल जास्त माहिती आहे. माझी सरकारला विनंती आहे, मर्डरची आणखी अनेक प्रकरणे उघडता येतील. अंकुश राणे, मंचेकर, गोवेकर ही सर्व प्रकरणे सरकारने उघडली पाहिजेत. त्यांच्या मागे कोण आहे हे बघितलं पाहिजे. माझी अशी सरकारकडे मागणी आहे, असेही वैभव नाईक म्हणाले.
राणेंनी आज शिवसेनेवर केलेले आरोप -
बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी शिवसेना काढली. सध्याचे प्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आले आहे, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मातोश्री पार्ट 2 बेकायदेशीर आहे. पैसे भरुन बांधकामाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. माझ्याकडे त्यांच्या दोन्ही घरांचे प्लॅन असल्याचे राणे म्हणाले. महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे. उत्पन्न काय वाढले का? कायदा सुव्यस्था नाही. बेकारी वाढली आहे आणि हे म्हणतात मराठी माणसासाठी शिवसेना. मराठी माणूस मुंबईतून तडीपार झाला आहे. मराठी माणसांसाठी तुम्ही काय केले. उद्योग, रोजगार दिले का? असा सवाल देखील राणेंनी शिवसेनेला केला. हे विकासाचे काहीच बोलत नाहीत. म्हणूनच असे विषय करत असल्याचे राणे यावेळी म्हणाले.