सरकार पाडण्यात कुठलाही रस नाही, अमित शाहांसोबतची भेट राजकीय नाही : देवेंद्र फडणवीस
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची लघु-सूक्ष्म उद्योगांप्रमाणेच साखर उद्योगालाही पॅकेज देण्याची केंद्र सरकारकडे मागणी केली.
मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. फडणवीस यांनी शाह यांच्यासोबत दीड तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले, ही राजकीय भेट नसून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात रस नाही.
'यावर्षी महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढल असून शेतकऱ्यांना एफआरपी आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो. याबाबत अमित शाहांबरोबर सकारात्मक चर्चा झाली.सरकार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न नसून आम्हाला त्यात रस नाही, अंतर्विरोधाचं हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचं, असे देखील फडणवीस म्हणाले.
दरम्यान, त्यांनी महाजॉब्स योजनेवर आघाडीत सुरु असलेल्या नाराजीवर टीका केली. जाहिरातींवर कुणाचेही फोटो छापा, मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा झाला पाहिजे असे निर्णय घ्या, असे फडणवीस म्हणाले. केंद्रात आमच सरकार असल्यामुळे आवश्यक मागण्या घेऊन आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वेळ मिळाला तर त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची माहिती देईन, काय करता येईल याची माहिती देईन, असे फडणवीस म्हणाले.