मुंबई : बंडखोरी केलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा मनधरणी केली. विधानभवनात रामराजे निंबाळकर यांच्या चेंबरमध्ये तब्बल चार तास छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची अजित पवारांशी चर्चा केली. त्यानंतर हे चारही नेते विधानभवानाबाहेर पडले. खासदार सुनील तटकरे यांनीही सकाळी अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न केले. जवळपास तासभर तटकरे अजित पवारांसोबत होते. मात्र बाहेर आल्यानंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर विधानसभानातील बैठकीनंतर अजित पवार घरी परतले. दरम्यान, अजित पवारांच्या समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे, सकारात्मक मार्ग निघण्याची अपेक्षा असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसंच अजित पवार आणि शरद पवार यांचं बोलणं झालं नसल्याचंही ते म्हणाले.


23 नोव्हेंबरला सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुरुवातीला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा होती. परंतु शरद पवार यांनी ट्वीट करुन हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. यानंतर अजित पवारांनी बंड करुन भाजपला पाठिंबा दिल्याचं समोर आलं.

अजित पवारांची मनधरणी करण्यात अपयश
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हापासून राष्ट्रवादीकडून त्यांचं बंड शमवण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादीला यश आलेलं नाही. सुरुवातील दिलीप वळसे पाटील अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. परंतु दीड तासांच्या चर्चेनंतर काहीही हाती लागलं नाही. जयंत पाटील, सुनील तटकरे, रोहित पवार यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस, ट्विटर आणि फेसबुक पोस्टद्वारे भावनिक साद घालत अजित पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही यश आलं नाही. आजही विधानभवनात राष्ट्रवादीचे नेत्यांनी अजित पवारांशी चर्चा करुन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही : शरद पवार
अजित पवार यांच्या बंडामागे माझा हात नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. साताऱ्यातील कराडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपने सत्तेचा गैरवापर करुन हवे ते निर्णय घेतल्याचा आरोप पवारांनी केला. तसंच राष्ट्रवादीचा भाजप सरकारला पाठिंबा नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. याशिवाय राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकासआघाडीचं सरकारच येईल, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या -