सध्या राज्यात राजकीय महानाट्य सुरु असून भाजपसह महाआघाडीतील पक्षही बहुमत आमच्याकडेच असल्याचा दावा करत आहे. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन केले आहे. या घटनेनंतर दोन आठवड्यापासून शांत असणारी भाजप सक्रीय झाली आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, आशीष शेलार पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. काल राष्ट्रवादीने आमदारांची बैठक घेऊन अजित पवारांची विधीमंडळ नेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. यावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे. या सर्व घटनांवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे. "मा. शरद पवारसाहेब यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सूर्य होते, आजही आहेत व उद्याही कायम असतील". असे ट्वीट जयंत पाटील यांनी केले आहे.
जयंत पाटलांचे अजित पवारांना आवाहन -
भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांनी दुपारी एक ट्वीट केले होते. त्यात "मी राष्ट्रवादीमध्ये आहे, आणि कायम राष्ट्रवादीसोबत राहीन. शरद पवार साहेबच आमचे नेते आहेत, असं ते म्हणाले होते. या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भावनिक आवाहन केले आहे. "आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहात. आदरणीय पवार साहेबांच्या सावलीत आपण सगळेच वाढलो आहोत. मात्र, राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. साहेबांच्या या निर्णयाचा आदर ठेवून आपण परत या, असे जयंत पाटील म्हणाले.
भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - शरद पवार
मी राष्ट्रवादीतच आहे आणि कायम राहणार. शरद पवारच आमचे नेते आहेत. पुढील पाच वर्षासाठी राष्ट्रवादी आणि भाजप हे महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकेल, असं अजित पवारांनी ट्वीट केले आहे. यावर भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आघाडीसोबत सत्तास्थापन करणार आहे. अजित पवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे, असे उत्तर शरद पवार यांनी अजित पवारांच्या ट्वीटला दिले आहे.
संबंधित बातम्या -
अजित पवारांची भाजपसोबत जाण्यामागची 10 कारणं
शरद पवारांच्या खंजिर प्रकरणाची ही पुनरावृत्ती : शालिनी पाटील
बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन 'लोटस' आणि 'शिवतेज'?
Why Ajit Pawar supported BJP? अजित पवार भाजपसोबत जाण्यामागची "ही" दहा कारणं! | ABP Majha