वैद्यकीय अधिकाऱ्याचे आरोग्य सहाय्यिकेबरोबर संबंध, पत्नीच्या तक्रारीनंतर परभणीतील डॉक्टर निलंबित
शासकीय वैद्यकीय सेवेत कर्तव्य बजावत असताना सहकारी महिला आरोग्य सहाय्यिकेसोबत संबंध ठेवणे वैद्यकीय अधिकार्याला महागात पडले आहे.परभणीच्या जिंतुर मधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कैलास पवार यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे.
परभणी : शासकीय वैद्यकीय सेवेत कर्तव्य बजावत असताना सहकारी महिला आरोग्य सहाय्यिकेसोबत संबंध ठेवणे वैद्यकीय अधिकार्याला महागात पडले आहे. वैद्यकीय अधिकार्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.
परभणीच्या कोल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत असताना वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास पवार आणि एक कंत्राटी आरोग्य सहाय्यिका यांचे गैर संबंध असल्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. सदर चौकशी दरम्यान डॉ. कैलास पवार व आरोग्य सहाय्यिका यांचे गैर संबंध असल्याचे दिसून आले.
त्यानुसार डॉ.पवार यांना ताकीद देऊन परत असा प्रकार होऊ नये म्हणून त्यांची तात्पुरत्या स्वरूपात जिंतुर तालुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बदली करण्यात आली होती. मात्र बदली करूनही या दोघांमधील संबंध कायम असल्याने त्यांच्या पत्नीने त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम 3 चा भंग करणे, शिस्त व अपील 4 प्रमाणे जिल्हा परिषदेची व सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन केल्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ कैलास पवार यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी निलंबित केले असून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत शिफारस ही केली आहे.