Marathwada Ganapati Visarjan: मराठवाड्यात बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात; मिरवणुका सुरु झाल्या, उत्साह शिगेला
श्रद्धा, भक्ती आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देत मराठवाड्यातील विविध शहरांमध्ये विसर्जन सोहळे पार पडत आहेत.

Marathwada Ganapati Visarjan: राज्यभरात आज बाप्पाला निरोप दिला जातोय. घरोघरी बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून भक्ती, श्रद्धा आणि उत्साहात साजरा झालेल्या गणेशोत्सवाचा समारोप आज (शनिवार, 6 सप्टेंबर) मराठवाड्यात मोठ्या थाटामाटात होत असून ठिकठिकाणी मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तिमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा विसर्जनासाठी नदी-तलाव तसेच महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये दाखल होत आहेत. श्रद्धा, भक्ती आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देत मराठवाड्यातील विविध शहरांमध्ये विसर्जन सोहळे पार पडत आहेत.
जालन्यात घरगुती विसर्जनाला सुरुवात
जालना शहरात घरगुती गणपतींच्या विसर्जनाला मोती तलावावरील विसर्जन कुंडातून सुरुवात झाली. जालनेकरांनी मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. मानाचा नवयुग गणपतीचा विसर्जन सोहळा संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजता सार्वजनिक मंडळांचे बाप्पा विसर्जनासाठी दाखल होणार आहेत. विसर्जन स्थळी महापालिका व पोलिसांकडून काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
धाराशिवमध्ये अनोखी देशभक्तीपर थीम
धाराशिवमध्ये लोकमान्य टिळक तरुण मंडळाने अनोखी देशभक्तीपर थीम साकारून बाप्पाची मिरवणूक काढली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाचा संदेश देत डॉल्बीमुक्त मिरवणूक काढण्यात आली. तर जय मल्हार तरुण मंडळाने पारंपरिक पोतराज कला सादर करत नृत्य आणि वेशभूषेद्वारे गणेशभक्तांची मने जिंकली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हातलाई तलाव अशी ही भव्य मिरवणूक काढण्यात आली.
परभणीत भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप
परभणीतही भक्तिमय वातावरणात विसर्जन पार पडत आहे. शहरातील जलशुद्धीकरण केंद्रावरील कृत्रिम तलावात विसर्जनाची सोय करण्यात आली असून सकाळपासून घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन सुरू आहे. दुपारपर्यंत तब्बल 350 गणपतींचे विसर्जन झाले असून संध्याकाळपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तलाव परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला उत्साहाची लगबग
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्वतः मिरवणुकीत सहभागी होत बाप्पाला डोक्यावर घेत शतपावली केली. जिल्हा परिषदेच्या मैदानातील विसर्जन विहिरीत त्यांनी बाप्पाला निरोप दिला. आयुक्तांच्या या सहभागामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. एकूणच, मराठवाड्यातील जालना, धाराशिव, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध शहरांमध्ये बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला उत्साहाची लगबग आहे. पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीतांचे स्वर आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देत मराठवाडा आज "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या गजरात दुमदुमत आहे.























