मराठवाड्यात आभाळ फाटलं, 24 तासात 33 महसूल मंडळात अतिवृष्टी, गोदापात्रात प्रचंड विसर्ग, खरीप पिकांना मोठा तडाखा
या वर्षात पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले आहेत. विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे उघडल्याने गोदापात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे.

Marathwada Rain update: राज्यभरात मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. ऑगस्ट महिन्यात दमदार हजेरी लावल्यानंतर एका विश्रांतीनंतर राज्यभरात पावसाने पुनरागमन केलं आहे. मराठवाड्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून तब्बल 33 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर ,जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी नोंदवण्यात आली आहे. कालपासून मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाची संततधार होती. रात्रभर झालेल्या पावसामुळे नद्या नाले तुडुंब वाहत असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक नद्यांना पूर आले आहेत. या वर्षात पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले आहेत. विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे उघडल्याने गोदापात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे हाय अलर्ट हवामान खात्याने दिले आहेत. मराठवाड्यात कुठे काय परिस्थिती? जाणून घेऊया.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विक्रमी पाऊस
सर्वाधिक पावसाचा मारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात झाला. येथे 10 महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदवली गेली असून, पैठण तालुक्यातील नांदर मंडळात तब्बल 208 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय जालना जिल्ह्यातील 5, बीडमध्ये 7, लातूरमध्ये 7, धाराशिवमध्ये 1, नांदेडमध्ये 2 आणि हिंगोलीत 1 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
नद्या-नाल्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील सर्व नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. बीड जिल्ह्यात सरस्वती नदीला पूर आला असून कोथाळा–सिरसाळा गावांचा संपर्क तुटला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. वडीगोद्री आणि गोंदी महसूल मंडळात अतिवृष्टी नोंद झाली असून मांगणी नदीला पूर आला आहे. नालेवाडी गावात आदिवासी कुटुंब पाण्यात अडकले असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.
धरणांचे दरवाजे उघडले
जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे यंदा पहिल्यांदाच उघडण्यात आले असून गोदावरी पात्रात तब्बल 1 लाख 13 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून जवळपास 44 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
खरीप पिकांचे नुकसान
मराठवाड्यातील मुसळधार पावसामुळे बहुतांश नद्या-नाल्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांचे अक्षरशः संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर सोयाबीन, मुग, उडीद, ऊस यांसह खरीप पिकं वाहून गेली, अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
हेही वाचा
























