एक्स्प्लोर
Advertisement
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गारपिटीनं हिरावला
विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना तुफान गारपिटीचा तडाखा बसला आहे.
मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना तुफान गारपिटीचा तडाखा बसला आहे. मराठवाड्यातील जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये गारपिटीनं अक्षरश: थैमान घातलं आहे.
शेताशिवार तसेच रस्त्यांवर गारांचा खच पडलेला दिसत होता. जालन्यातल्या काही रस्त्यांवरुन जाताना तर आपण काश्मीरमध्ये आहोत की काय, असाही अनुभव येत होता. लिंबाएवढ्या आकाराच्या या गारांमुळे शेतीपिकांचे तर अतोनात नुकसान झालं आहे.
हरभरा, ज्वारी, गहू आणि द्राक्ष बागा अक्षरश भुईसपाट झाल्या आहेत. यंदा दमदार रब्बी पिकांनी परिसरातील शिवार बहरला असताना अचानक झालेल्या गारपीटीमुळे होत्याचं नव्हतं झालं. हातातोंडाशी आलेले पीक पुन्हा मातीत मिसळल्याने बळीराजा धास्तावला आहे.
विदर्भातही गारपिटींचं थैमान
मराठवाड्याबरोबरचं विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीचं थैमान बघायला मिळालं. बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यांना गारपिटीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, देऊळगाव राजा, सिंदेखड राजा आणि चिखली तालुक्यात तुफान गारपिट झाली आहे. तर तिकेड अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
बाळापूर, तेल्हारा, अकोट तालुक्याला गारपीटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. कांदा, गहू, तूर, हरभरा पिकांचं नुकसान झालं आहे तर विटभट्यांवरचा कच्चा मालही खराब झाला आहे.
गारांच्या तडाख्यानं 3 जणांचा बळी
जालना जिल्ह्यात गारपिटीमुळे पिकांचं नुकसान तर झालंच आहे मात्र या दोन वयोवृद्धाना आपला जीवही गमवावा लागला आहे. जालना तालुक्यातील वंजार उमरदमधील नामदेव शिंदे सकाळी जनावरांचा गोठा साफ करण्या साठी जात असताना अचानक गरपीठ झाली. या गारांच्या माऱ्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर निवडुंगा गावातल्या आसाराम जगताप यांचाही मृत्यू झाला. गारपिटीची तीव्रता इतकी होती गावात जवळपास २०० कोंबड्यांचा देखील मृत्यू झाला.
दुसरीकडे वाशिम जिल्हयातल्या रिसोड तालुक्यात गारपिटीच्या तडाख्यात सापडल्यामुळे एका महिलेलाही आपला जीव गमवावा लागला आहे.
पंचनाम्याचे आदेश
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाच्या भरपाईसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला आहे, तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पंचनामे केले जातील, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीसाठी विमा संरक्षण असून मयतांच्या परिवाराला सुद्धा मदत केली जाईल, असं आश्वासन देशमुखांनी दिलं.
गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत, असे आदेश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. विमा कंपनीसोबत तातडीची बैठक बोलवण्याचे निर्देशही फुंडकरांनी दिले आहेत.
ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचं तसंच काढणी पश्चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचं नुकसान झालं आहे, त्याबाबत त्वरित विमा कंपन्यांना माहिती कळवण्यास फुंडकरांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पुन्हा गारपीट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement