Maratha Reservation: मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, संभाजीराजेंचा निर्धार
खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) हे कालपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आझाद मैदानावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील आहेत.

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) हे आमरण उपोषणाला बसले आहेत. कालपासून आझाद मैदानावर त्यांच्या उपोषणाल सुरूवात झाली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दिवस आहे. दरम्यान, संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानातच पहिल्या रात्रीचा मुक्काम केला. दरम्यान, मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार संभाजीराजेंनी केला आहे.
15 फेब्रुवारीला संभाजीरजे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. कालच्या दिवसभरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच राज्यातील विविध संघटनांनी देखील संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटनांसह नेत्यांचा देखील पाठिंबा मिळत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भर पडली आहे. त्यांनी संभाजीराजे यांना पाठिंब्याचे पत्र देत या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, काल दिवसभरात अनेक नेत्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावली, तसेच संभाजीराजे यांची भट घेतली. भाजपचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे देखील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज तुळजापूर येथे लक्षणिक उपोषण करणार आहेत. तसेच काल हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील उपोषणस्थळी हजेरी लावत संभाजीराजे यांना पाठिंबा दर्शवला. छत्रपती घराण्याच्या तलवारीची ख्याती आहे. आज या राजघराण्याला मराठा समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावं लागतंय. संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस आहे असं शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलंय. माझे राजे उपाशी असताना मी घरात कसा बसेन? मी इथं छत्रपतींचा मावळा म्हणून आलोय. दिल्लीमध्ये आम्ही राजेंच्या सोबत लढतोय. आज मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राजघराण्याला उपोषणासाठी बसावं लागतंय हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस असल्याचे ते म्हणालेत. महाविकास आघाडीच्या या संदर्भात बैठका सुरू आहेत. मी यासंबंधी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाने मांडणार असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असेही माने म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
