Maratha Reservation: ...अन् संयोगिताराजेंचे उपोषण संभाजीराजेंच्या हातून सुटलं, भावूक क्षणाचा महाराष्ट्र साक्षीदार
Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजीराजेंनी सुरू केलेलं उपोषण आज संपलं. त्याचवेळी त्यांच्या पत्नी संयोगिताराजेंनीही आपलं उपोषण सोडलं.
मुंबई: खासदार संभाजीराजेंच्या खांद्याला खांदा लावून गेल्या तीन दिवसांपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संयोगिताराजे आझाद मैदानावर उपस्थित होत्या. संयोगिताराजेंनी माझं न ऐकता उपोषण केलं आणि माझ्यावर गनिमी कावा केल्याचं खासदार संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजेंनी एका मुलीच्या हातून आंदोलन सोडल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी संयोगिताराजेंनाही रस दिला आणि त्यांचं आंदोलन सोडवलं.
खासदार संभाजीराजे गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत होते. राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात अशी त्यांनी मागणी केली होती. आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करत असून त्याची अंमलबजावणी लवकरच करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर खासदार संभाजीराजेंचे उपोषण सुटलं.
आपलं उपोषण सुटल्यानंतर संभाजीराजेंनी सर्वप्रथम त्यांच्या पत्नी संयोगिताराजेंना रस देऊन उपोषण सोडवलं. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणा दिल्या. खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "माझ्या पत्नी संयोगिताराजेंनीही माझ्यावर गनिमी कावा केला आहे. त्या दिवसभर उपोषणस्थळी रहायच्या आणि रात्री घरी जायच्या. त्यांनी माझं न ऐकता उपोषण केलं, काहीही खाल्लं नाही."
मराठा समाजाच्या खालील मागण्या मान्य झाल्या,
- मराठा समाजाला एसईबीसी आरक्षणातंर्गत 9 सप्टेंबर 2020 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वी नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण कोर्टाच्या निर्णयानंतर या नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. दरम्यान या उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
- मराठा समाजातील युवकांना अधिकाधिक नोकऱ्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार.
- सार्थीचं व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून, 2022 पर्यंत याची पूर्तता करणार.
- सार्थी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार.
- सार्थी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रिमंडळासमोर ठेवणार.
- आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी दिले असून आणखी 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी निधी देणार.
- मराठा समाजातील बांधवांना व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत. तसंच परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्ज फेडताना व्याज परताव्यासाठी नवी पॉलीसी ठरवू. तसंच कर्जाची मुदत 10 लाखांवरुन 15 लाख रुपये करण्यात आली आहे.
- आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळासह इतर संस्थासाठी पूर्णवेळ महासंचालक, तसंच इतर कर्मचारी पदांवरही नियुक्ती करु.
विविध जिल्ह्यात स्थापन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाची यादी मागवून त्याचा पाठपुरावा करु, तसंच सद्यस्थितीला तयार वसतिगृहाचं गुढीपाढव्यादिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करु.
कोपर्डी प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी महाधिवक्त्यांना सूचना करणार. - मराठा आंदोलकांवरी गुन्हे मागे घेण्याबाबत आढावा बैठक घेऊ, प्रकरणनिहाय निर्णय घेण्यात येतील.
- मराठा आंदोलनात मृत आंदोलकांच्या नातेवाईकांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. कागदपत्र पूर्तता करुन योग्य निर्णय घेऊ.
संबंधित बातम्या :
- Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्या मान्य; संभाजीराजेंनी उपोषण सोडलं
- Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजेंनी उपोषण सोडलं, सरकारकडून मागण्यांना हिरवा झेंडा, 'या' मुख्य मागण्या झाल्या मान्य
- 'त्यांना मानसिक त्रास देऊ नका!', संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजेंनी खडसावलं