एक्स्प्लोर
औरंगाबादच्या बैठकीत मराठा मोर्चासाठी राज्यव्यापी समिती स्थापन

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये काल मराठा क्रांती मोर्चा समिती स्थापन करण्यात आली. संपूर्ण राज्यातून समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रत्येक जिल्ह्यातून 11 जणांना निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत चर्चेनंतर सर्वानुमते एक राज्यव्यापी समिती तयार करण्यात आली. आजवर मराठा मोर्चांना कोणतेही राजकीय नेतृत्व नव्हते किंवा कोणताही राजकीय चेहरा नव्हता. त्यामुळे आता ही समिती स्थापन झाल्यानं या समितीला आपल्या मागण्या सरकारसमोर मांडून सरकारशी चर्चा करता येणार आहे. मराठा क्रांती मोर्चा समितीतील सदस्य 1. न्या. पी. बी सावंत 2. न्या. बी. एन. देशमुख 3. न्या. म्हसे 4. सदानंद मोरे 5. प्रा. तांबे 6. जयसिंगराव पवार 7. वसंतराव मोरे 8. निर्मलकुमार देशमुख 9. राजेंद्र कोंढरे औरंगाबादमध्ये झालेल्या या बैठकीतून विविध मागण्यातून एक ठराव मांडण्यात आला. या ठरावात असलेल्या मागण्या सर्वांसमोर मांडण्यात आल्या. 1. कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून ६ महिन्यात निकाल लावावा. २. मराठा आरक्षण मिळावे. 3. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावेत. 4. स्वामीनाथन आयोग लागू करावा. 5. अण्णासाहेब पाटील महामंडळाला ५ हजार कोटी रुपये द्यावेत. 6. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. 7. शाहू महाराजांच्या नावाने कौशल्य विकासासाठी स्वायत्त संस्था सुरु करावी. 8. शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करावी. 9. अरबी समुद्रातील शिवस्मारक २०१७पूर्वी पूर्ण करावे. 10. १४ डिसेंबरला नागपूरचा मोर्चा होईल. तो अधिवेशनावर काढण्यात येईल. त्यानंतर मुंबईच्या मोर्चाची तारीख ठरवली जाईल. मुंबईचा मोर्चा शेवटचे अस्त्र राहील. हा ठराव मांडल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या 11 जणांनी व्यासपीठावर येऊन मोर्चाच्या पुढील वाटचालीबद्दल मते व्यक्त केली. - हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नाही, फक्त आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. - आजपर्यंत मोर्चात जी शिस्त होती. तशीच शिस्त पुढेही कायम ठेवावी - जगातला सर्वात मोठा, शांतीचे आणि शिस्तीचे प्रदर्शन घडविणारा हा मोर्चा आहे. - कधीही दगड उचलू नका, अहिंसेसारखी शक्ती नाही - नाशिक येथील भडक बातम्या येत आहेत, तरी सर्वांनी शांतता राखावी. मोर्चाचा संबंध याच्याशी कोणी जोडू नये, कोणाला जोडू देऊ नये, असा प्रयत्न कोणी विघनसंतोषी करू शकतात. यासाठी सर्वांनी सजग राहावे. - मुंबई अधिवेशनाआधी आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात, अन्यथा हिवाळी अधिवेशनावर 14 डिसेंबरला भव्य मोर्चा काढणार. - मुंबईचा मोर्चा आमचे ब्रम्हास्त्र असून शासनाने आमची दखल नाही घेतल्यास मुबंईचे मोर्चाचे "विशेष" नियोजन सर्वांशी बोलून ठरविणार - आरक्षणाचा विशेष अभ्यास करण्यासाठी राज्यपातळीवरील तज्ज्ञांची समिती केली असून, ही समिती आरक्षण मागणीचा तांत्रिक मसुदा, मोर्चाला तयार करून देण्याचे काम करेल. या मागण्या सर्वांसमोर मांडण्यात आल्या. या ठरावाचे व मागण्यांचे वाचन मुलींनी व्यासपीठावर केलं
आणखी वाचा























