Manoj Jarange Patil: 'सरकार सकारात्मक, मनोज जरांगे यांनी जरा दमाने घ्यावं...'; गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil: मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटीमध्ये सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी उपचार घेतले होते. पण सरकार जोपर्यंत तोडगा काढणार नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतचा तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. याचदरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मागील काळात मनोज जरांगे यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहे. आताही त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगेंनी जरा दमाने घ्यावे , कारण चर्चेतून मार्ग निघू शकतात, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. आपलं हे अखेरचे उपोषण आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण विधानसभेची तयारी करणार असल्याचे मनोज जारंगेंनी म्हटलं होतं. यावर आज गुलाबराव पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगेंच्या मागण्यासाठी आष्टीकरांचे राज्यपालांना पत्र-
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केला आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाला द्यावे असे पत्र हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी राज्याचे राज्यपाल यांना लिहिले आहे. अंतरवाली सराटी येथे 8 जून पासून मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती खालावत असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे तत्काळ मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे निर्देश राज्य शासनाने द्यावे, असं पत्र हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी राज्याचे राज्यपाल यांना लिहिले आहे.
सहा दिवसांपासून उपोषण-
गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातंर्गत शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसी (OBC Resrvation) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी लावून धरली आहे. तसेच कुणबी नोंदी (Kunbi Maratha) असलेल्या मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या व्याखेत बसणारे आरक्षणही लागू व्हावे, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. आता याबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या:
बजरंग सोनावणेंनी पुन्हा घेतली जरांगेंची भेट; म्हणाले, सर्व खासदार-आमदारांना एकत्र करणार