Majha Katta: कुटुंबाची पार्श्वभूमी गुजरातची, पण लहान असतानाच मुंबईमध्ये आलो, गिरणगावात राहताना मराठी शिकलो, तिथल्या वातावरणाचा आपल्या संगीतावर प्रभाव असल्याचं संगीतकार आनंदजी यांनी सांगितलं. सफर, डॉन, कुर्बानी, मुकद्दर का सिंकदर यासारख्या चित्रपटांना संगीत देणारे आणि अनेक गायकांना घडवणारे कल्याणजी-आनंदजी (Kalyanji–Anandji) या जोडीतील आनंदजी आज एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी या आठवणींना उजाळा दिला.


सन 1976 साली 'नागिन' या सिनेमातून कल्याणजी-आनंदजी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. संगीत ऑर्केस्टाचा देशातील पहिलाच प्रयोग या जोडगोळीने केला होता.


मराठीवर प्रेम करायला शिकलो
आनंदजी हे मूळचे गुजरातचे असले तरी ते स्पष्ट आणि चांगली मराठी बोलतात. त्यामागचे रहस्य काय असं विचारलं असता ते म्हणाले की, "कोणतीही भाषा शिकायची असेल तर पहिला तिच्यावर प्रेम करायला शिकावं. लहान असताना गिरगावात मराठी मुलांच्या संगतीत राहून आपण मराठी शिकलो. त्या ठिकाणी खूप मस्ती केली."


गाण्याचा नाद आजोबांमुळे लागला
आपल्याला संगीताचा नाद हा आईच्या वडिलांमुळे लागल्याचं आनंदजी यांनी सांगितलं. आपल्या आजोबांना गाणी ऐकण्याची आवड असल्यामुळे आपल्याला गाण्याची आवड निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. गिरणगावातील वातावरणाचा आपल्या संगीतावर परिणाम झाल्याचं ते म्हणाले. 


गिरगावात असताना एका नागपंचमीत बिन म्हणजे पुंगी वाजवल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचा फायदा हा 'नागिन' या चित्रपटातील गाण्यासाठी झाल्याचं ते म्हणाले. सुरुवातीला आपण ऑर्केस्ट्राचा शो केला. त्यामधून काही पैसे मिळायचे. लतादीदींनी गायलेलं 'चाहे पास हो, चाहे दूर हो' हे गायलेलं गाणं हे आपलं पहिलं गाणं होतं असं आनंदजींनी सांगितलं.


राजकपूर-नर्गिसचे ब्रेक-अप, त्यावर गाणं लिहिलं
राजकपूर-नर्गिसचे ब्रेक अप झाल्यानंतर आपल्याला वाटलं सगळंच संपलं. चित्रपटात होणाऱ्या गोष्टी या खऱ्या आयुष्यात घडत होत्या. त्यावेळी आपण दुकानात बसून 'मेरे तुटे हुवे दिल से कोई तो आज ये पुछे, तेरा हाल क्या है' हे गाणं लिहिलं. 


'कल्याणजी-विरजी'चे कल्याणजी आनंदजी झालं
कल्याणजी-आनंदजी या नावामागचा किस्सा सांगताना आनंदजी म्हणाले की, मनमोहन देसाई यांनी चित्रपट दिग्दर्शित करायचं ठरलं आणि त्याला संगीत देण्याचं काम मिळालं. त्यावेळी कल्याणजी-विरजी या नावानं संगीत देत होतो. विरजी हे वडिलांचं नाव. निर्मात्यांनी हे बदललं आणि पुढे कल्याणजी-आनंदजी या नावाने संगित द्यायला सुरुवात केली. 


ज्या-ज्या वेळी देशावर गाणे तयार करण्याची संधी मिळाली त्या-त्या वेळी ती गाणी तयार केली आणि त्यामध्ये समाधान मिळाल्याचं आनंदजी यांनी सांगितलं. 


संबंधित बातम्या: