Solapur News Update : सोलापूर जिल्हा सहकारी दुध संघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी निर्विवाद वर्चस्व दाखवून दिलंय. दूध संघाच्या संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व जागांवर सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघावर प्रशासक नेमण्यात आले होते. मात्र या ठिकाणी  निवडणुका घेण्याच्या सूचना न्यायलयाने केल्या होत्या. त्यानंतर संचालक मंडळाच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक लागली होती. यंदा सत्ताधाऱ्यांच्या शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात दूध उत्पादकांच्या दूध संघ बचाव पॅनेलने आव्हान दिले होते. मात्र आज झालेल्या निवडणूकीत दूध संघ बचाव पॅनेलचा अक्षरश: सुपडा साफ झाला. 


सुरुवातील ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. माढ्याचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल यांनी पुढाकार घेत दूध संघ बचाव पॅनेलच्या प्रमुखांशी बोलणी देखील केली. मात्र ही बोलणी फिस्कटल्याने 17 पैकी 16 जागांसाठी मतदान प्रक्रिया घ्यावी लागली. तर मोहोळची एक जागा ही बिनविरोध सत्ताधारी पॅनेलच्याच दीपक माळी हे निवडले गेले होते. उर्विरित 16 जागासांठी मतदान प्रक्रिया पार पडली. 


सत्ताधारी असलेल्या शेतकरी विकास आघाडीत अनेक नेत्यांचे नातेवाईक, जवळचे कार्य़कर्ते हे उमेदवार असल्याने या नेत्यांच्या प्रतिष्ठा देखील पणाला लागल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या सून वैशाली साठे यांना शेतकरी विकास आघाडीने तिकीट नाकारल्याने त्यांनी थेट विरोधात आव्हान देऊन दूध संघ बचाव समितीतून निवडणूक लढवली. त्यामुळे ही निवडणूक आणखीनच चुरशीची झाली होती. सत्ताधारी शेतकरी विकास आघाडी ही जरी विजयी होईल असा अंदाज असला तरी वैशाली साठे ह्या देखील विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अखेर वैशाली साठे यांचा देखील पराभव या निवडणुकीत झाला. 


दरम्यान विजयाची बातमी कळताच नेते दिलीप सोपल यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली. यावेळी कार्य़कर्त्यांनी एकच जल्लोष केला. "मध्यतंरी ज्येष्ठ नेते कै. गणपतराव देशमुख, कै. सुधाकरपंत परिचारक आणि विजयसिंह मोहिते पाटील असे सर्व नेते दूध संघासाठी काम करत असताना निवडणुका ही झाल्या आणि अनेक वेळा सदस्य बिनविरोध देखील निवडून गेले. यावेळी देखील आम्ही संचालक मंडळ बिनविरोध कऱण्याचे प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने या चर्चांना यश आले नाही. त्यामुळे निवडणूक लागली. सर्वांनी सर्व ठिकाणी, कार्यकर्त्यांनी, उमेदवारांनी मतदारांनी विश्वास दाखवला. त्यामुळे या निवडणुकीत यश प्राप्त झाले. नवीन संचालकांसमोर फार मोठे आव्हान आहे. याची कल्पना आम्ही आधीच त्यांना दिली आहे. या विजयामुळे आम्ही हुरळून गेलेलो नाही. उलट आमची जबाबदारी जास्त वाढली आहे. दूध संघाच्या समोरील संकंटाचा डोंगर आम्ही पार करु असा आत्मविश्वास आम्हाला आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर बोलताना माजी मंत्री दिलीप सोपल यांनी दिली. 


महत्वाच्या बातम्या