Mahashivratri 2022 : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग, जाणून घ्या पौराणिक महत्व
Mahashivratri 2022 : भगवान शिवाच्या भक्तांसाठी भारताच्या विविध भागात 12 ज्योतिर्लिंग आहेत. या ज्योतिर्लिंगांपैकी पाच महत्वाची ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत.
Mahashivratri 2022 : हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप पवित्र मानले जाते. महादेवाच्या विशेष उपासनेसाठी महाशिवरात्रीची ख्याती आहे. जीवनातील दुःख, अडचणी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाची भक्तिभावाने उपसना केली जाते. प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी, देवतांनी, असुरांनी देवांचे देव महादेवाची तपश्चर्या करून विविध वरदान प्राप्त केले आहेत. श्रावणात भारतातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी होते. या बारा ज्योतिर्लिंगामधील पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत.
ज्योतिर्लिंग हे हिंदू देवता शिवाचे पवित्र प्रतिनिधित्व आहे. महाराष्ट्र ही विविध धर्मांची भूमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हजारो मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे आहेत. भगवान शिवाच्या भक्तांसाठी भारताच्या विविध भागात 12 ज्योतिर्लिंग आहेत. या ज्योतिर्लिंगांपैकी पाच महत्वाची ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. जाणून घ्या महाराष्ट्रातील या पाच ज्योतिर्लिंगांविषयी...
महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांची नावे :
1. वैजनाथ (महाराष्ट्र - परळी, बीड जिल्हा)
परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी 300 फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते. तसेच येथे परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.
2. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर,खेड तालुका, पुणे जिल्हा)
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगांमधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.
3. नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ,हिंगोली जिल्हा)
भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणार्या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव आणि तालुका आहे. आमर्दकपूर (औंढा-नागनाथ, जि. हिंगोली) हे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक असे आहे. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. 'आमर्दक सन्तान' या नावाने ओळखल्या जाणार्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता. यामुळेच दरवर्षी औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीच्या यात्रेला गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांतून भाविक दर्शनासाठी येतात.
4. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा)
त्र्यंबकेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.ते तालुक्याचे ठिकाण आहे. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम याच त्र्यंबकेश्वरात झाला.
5. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -वेरुळ,खुल्ताबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा)
घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha