महाराष्ट्र बंद : लातूरात आमदार त्र्यंबक भिसे यांना धक्काबुक्की
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनालादरम्यान लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार त्र्यंबक भिसे यांना धक्काबुक्की केली आहे.
लातूर : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनालादरम्यान लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार त्र्यंबक भिसे यांना आंदोलकांनी धक्काबुक्की केली आहे. तसेच भिसे यांच्या गाडीवर आंदोलकांनी दगडफेकही केली. रेनापूर फाटा याठिकाणी हा सगळा प्रकार घडला.
आजच्या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भिसे मतदारसंघातील अनेक गावात फिरत होते. यावेळी भिसे यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. तुम्ही समाजासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घातला. आंदोलकांनी भिसे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. काही लोकांनी आमदार भिसे यांना या गोंधळातून बाहेर काढले आणि सुरक्षितस्थळी नेले. दरम्यान काही आंदोलकांनी त्यांना धक्काबुक्कीही केली.
पुण्यात मराठा मोर्चाला हिंसक वळण सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागलं. आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. तसेच आंदोलकांनी भिंतीवर चढून घोषणाबाजी केली. एवढंच नाही तर या संपूर्ण घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या मीडियाच्या प्रतिनिधींनाही धक्काबुक्की केली. तसेच आंदोलकांनी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावर हात ठेवून वृत्तांकन रोखण्याचा प्रयत्न केला.
नाशिकमध्येही आंदोलकांचा गोंधळ नाशिकमध्येही मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. डोंगरे वसतीगृह मैदानावर आंदोलकांतील दोन गटात वाद झाला. त्यानंतर काही काळ तिथं तणावाचं वातावरण होतं. यावेळी पोलिसांनी गर्दीला पांगवल्यानं पुढील प्रकार टळला. माजी आमदार माणिकराव कोकाटे स्टेजवर गेल्यानं हा वाद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान परिस्थिती आता नियंत्रणात असून, प्रशासनाकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे.
संबधित बातम्या
महाराष्ट्र बंद : पुण्यात आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड
मराठा मोर्चात वऱ्हाड, आंदोलनास्थळीच लग्न!
महाराष्ट्र बंद: विधानभवनाच्या गेटवर आमदार आबिटकरांचा ठिय्या
महाराष्ट्र बंद : आचारसंहितेचं उल्लंघन, पेटवा-पेटवी कोण करतंय?
महाराष्ट्र बंद : शरद पवारांच्या बारामतीमधील घराबाहेर ठिय्या
महाराष्ट्र बंद : कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद?
काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मोर्चेकऱ्यांनी चंद्रकांत खैरेंना हाकललं