Yuva Sena: आदित्य ठाकरेंच्या युवासेना प्रमुखपदालाच चॅलेंज? पूर्व विदर्भाच्या युवा सेनेच्या दीडशे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Maharashtra News : शिवसेनेसोबत युवा सेनेवर शिंदे गटाचा दावा स्ट्राँग होत चालला आहे. यानंतर आता पक्षसंघटनेसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.
मुंबई : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या युवासेना प्रमुख (Yuva Sena) पदाला आव्हान देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न दिसतोय. पूर्व विदर्भातील युवासेनेचे दीडशे पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पूर्व विदर्भातील युवासेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानं ठाकरे गटाला हादरा बसला आहे. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे यांनी युवासेनाप्रमुखपद घ्यावं, अशी मागणी त्यांनी केलीय. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या युवासेना प्रमुखपदालाच त्यांनी थेट आव्हान दिले आहे
प्रमुख पदाधिकारी करणार आज प्रवेश
- हर्षल शिंदे (युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर)
- शुभम नवले (युवासेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण)
- रोशन कळंबे (युवासेना जिल्हाप्रमुख भंडारा)
- दीपक भारसाखरे (गडचिरोली युवासेना जिल्हाप्रमुख)
- कगेश राव गोंदिया (युवासेना जिल्हाप्रमुख)
- ऋषिकेश मिश्रा( युवासेना जिल्हाप्रमुख गोंदिया)
- नेहा भोकरे (युवतीसेना जिल्हाप्रमुख नागपूर)
- सोनाली वैद्य (युवतीसेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण)
- प्रफुल सरवान (जिल्हा समन्वयक नगरसेवक भद्रावती चंद्रपूर जिल्हा)
- राज तांडेकर (जिल्हा समन्वयक नागपूर)
- लखन यादव (जिल्हा समन्वयक रामटेक)
- कानाजी जोगराणा (जिल्हा चिटणीस नागपूर)
- अभिषेक गिरी (उप-जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण)
- सुनील यादव (रामटेक विधानसभा समन्व्यक)
एकामागोमाग एक सुरु असलेल्या इनकमिंगमुळे शिंदे गटाची युवा सेना अधिकाधिक स्ट्राँग होत चालली आहे. शिवसेनेसोबत युवा सेनेवर शिंदे गटाचा दावा स्ट्राँग होत चालला आहे. यानंतर आता पक्षसंघटनेसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना थेट रंगला. आता श्रीकांत शिंदे पडद्यामागून सर्व धुरा सांभाळत आहेत. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्याकडे युवा सेनेची कमान हाती दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचं थेट आव्हान आता आदित्य ठाकरेंना दिलं आहे. शिवसेना उभी फुटलेली सर्वांनी पाहिली आता युवा सेना वाचवण्याचं काम आदित्य ठाकरे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर आहे.
आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा खोक्यावरून निशाणा साधला. कोण गद्दार आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो पण कारवाई होत नाही. दुसरा एक गद्दार महिलांना शिवीगाळ करतो, पण कारवाई होत नाही. अशा लोकांना पद पदमुक्त करून मंत्रीमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पण कुठेही कारवाई होत नाही. एका गद्दाराच्या राक्षसी महत्वकांक्षामुळे संपूर्ण महाराष्ट्र मागे चालला असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्हे तर मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे की, ते अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले.