(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कमाल! एका तिळाचे शंभर तुकडे, यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या अभिषेक रुद्रवारची कामगिरी
यवतमाळमधील अभिषेक रुद्रवार या 23 वर्षीय तरुणाने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने 16 मिनिटे 20 सेकंदात चक्क शंभर तुकडे केले आणि त्यांना क्रमांकही दिले.
यवतमाळ : एक तीळ सात जणांनी वाटून खावा असा एक वाक्प्रचार आहे आणि हा छोटासा तीळ सर्वांनी तो कसा वाटून खावा हा प्रश्नच आहे. या म्हणीचा विचार करत आणि त्यातून प्रेरणा घेत पुसदच्या अभिषेक रुद्रवार या 23 वर्षीय तरुणाने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने 16 मिनिटे 20 सेकंदात चक्क शंभर तुकडे केले आणि त्यांना क्रमांकही दिले. त्याच्या या अभिनव कृतीची दखल घेत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद करण्यात आली आहे.
पुसद शहरातील विटावा वॉर्डातील अभिषेक सध्या नांदेड येथील एमजीएम कॉलेज मध्ये बीएफए बॅचलर ऑफ फाईन आर्ट अंतिम वर्षाला शिकत आहे. मुळात तो कलावंत आहे. मायक्रो आर्ट हा त्याच्या आवडीचा विषय आहे. त्याने आतापर्यंत मोहरी, तांदूळ, सुपारी, खडू, पेन्सिल, माचीसची काडी यावर गणपतीचे चित्र रेखाटले आहे. तिळावर चक्क त्याने ABCD यासारखे इंग्रजी मुळाक्षरे तर 1 ते 10 पर्यंतचे अंक लिहिले आहेत. तसेच पेन्सिलच्या टोकावर त्याच्या सूक्ष्म कलेतून माहूरची रेणुका, कोल्हापूरची देवी साकारली आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खावा' हा वाक्प्रचार एका तिळाचे 100 तुकडे करण्यासाठी प्रेरणादायी ठरला असे अभिषेक सांगतो.
तिळाचे एवढे सुक्ष्म तुकडे आपण उघड्या डोळ्याने सहजतेने पाहू शकतो. मागील चार पाच वर्षापासून सुक्ष्म कला त्यांनी जपली आहे त्याच्या कलेचे अनेक कंगोरे आहेत. वाळलेल्या पानांवर कटिंग करून गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे चेहरे साकार करणे, एक रूपयाच्या नाण्यावर विविधरंगी निसर्ग चित्र रेखाटणे,आपट्याच्या पानावर सुरेख निसर्गरंग भरणे असा कलात्मक छंद अभिषेकने जोपासला आहे. याशिवाय जुन्या नाण्यांचा मोठा संग्रह अभिषेककडे आहे. तांदळाच्या दाण्यावर तो सहजतेने झेंडा रेखाटतो. संक्रांतीला पतंग तांदूळ दाण्यावर काढतो. विशेष म्हणजे अक्षरांमधून गणपतीचे रूप तो सहजतेने साकारतो. त्याने तयार केलेली अक्षर गणपतीची रूपे अक्षरशः मनाला भुरळ पाडतात. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर आता त्याला गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद करायची आहे. त्या दृष्टीने त्याची तयारी सुरू आहे
अभिषेकने सूक्ष्म कलेत प्रावीण्य मिळविले आहे.अत्यंत हलाखीची परिस्थितीतुन त्याने शिक्षण घेत सर्व कुटुंबाची अभिषेक जबाबदारी कलेच्या माध्यमातून अभिषेक सांभाळतोय या कलेतून आतापर्यंत मिळविलेल्या मिळकतीत तो स्वतःचे शिक्षण पूर्ण करीत आहे.त्याने तयार केलेली कलाकृती कर्नाटक, आंध्रप्रदेश ,दिल्ली राज्यात पोहोचली आहे.सूक्ष्म वस्तू वरील तयार केलेल्या गणपतीच्या विक्रीतून त्याला तीन ते चार लाखांची प्राप्ती झाली आहे. कला केवळ आनंददायीच,नव्हे भाकरीचा प्रश्न सुध्दा मिटविते त्यामुळे ही कला हजारो लोकांपर्यंत पोहचली पाहिजे असे अभिषेक सांगतो