Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असले, तरी आता स्थिर आणि कोरड्या हवामानामुळे रब्बी पेरणीसाठी योग्य परिस्थिती निर्माण होत आहे.

Maharashtra weather update: गेल्या काही आठवड्यांपासून परतीचा पाऊस आणि अवकाळी हवामानामुळे नागरिक हैराण झाले होते. शेतकऱ्यांच्या रब्बी पेरण्या खोळंबल्या होत्या . बंगालच्या उपसागरातील तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाल्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला .मात्र, आता पावसाच्या सर्व शक्यता ओसरल्या असून हवामान हळूहळू शुष्क व कोरडे होत असल्याचं हवामान विभागाने सांगितलं . (IMD Forecast) बहुतांश महाराष्ट्रात किमान तापमानात येत्या तीन दिवसात 3 ते 4 अंशांनी घट होणार असून मराठवाडा आणि विदर्भात हवेत गारवा जाणवू लागलाय . राज्यभरात बहुतांश ठिकाणी 1 ते 3 अंशांनी किमान तापमान घसरल्याचं दिसून येतंय . आज जळगाव जिल्ह्यात आज सर्वात कमी तापमान नोंदवले गेले. किमान तापमानाचा पारा 10° वर आला आहे . (Winter 2025)
हवामान विभागाचा अंदाज काय ?
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यभरात किमान तापमान घटण्यास सुरुवात झाली आहे .पुढील तीन ते चार दिवसात हळूहळू 2-3 अंशांनी किमान तापमानात घट होईल .कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात हिवाळा जाणवू लागेल . पुढील 48 तासात बहुतांश विदर्भात 2-3अंशांनी तापमान घसरेल
आज कोणत्या जिल्ह्यात किती तापमान ?
मुंबई ( CLB) - 23.5 अंश सेल्सिअस
मुंबई (SCZ) - 21 . 2
रत्नागिरी 22.7
नगर :14.6
जळगाव :10.8
जेऊर : 12
कोल्हापूर 19.6
महाबळेश्वर 13.2
नाशिक 13.4
पुणे 15.9
सांगली 18
सोलापूर 18.6
सातारा 17.1
छत्रपती संभाजी नगर 14.2
नांदेड 15.2
धाराशिव 17
परभणी 14.4
अकोला 14.7
अमरावती 13.3
ब्रह्मपुरी 18
बुलढाणा 14
चंद्रपूर 19.6
नागपूर 16
वर्धा 16.5
यवतमाळ 15
हवामान स्थिर होण्याच्या मार्गावर
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांची तीव्रता कमी झाल्याने राज्यभरातील पावसाचे प्रमाण घटणार आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर सकाळी हलका गारवा तर दुपारी सौम्य उष्णता जाणवेल. तर विदर्भ आणि मराठवाड्यात रात्रीचे तापमान घसरून थंडीस सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
रब्बी पिकांसाठी अनुकूल वातावरण तयार
अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असले, तरी आता स्थिर आणि कोरड्या हवामानामुळे रब्बी पेरणीसाठी योग्य परिस्थिती निर्माण होत आहे. गहू, हरभरा, ज्वारी, ओवा, मेथी, कांदा आणि मटार अशी थंड हवामानात वाढणारी पिके घेण्यासाठी ही वेळ पोषक मानली जाते. सध्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्याने बीज उगवणीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
























