Maharashtra Weather Update: राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढणार; मुंबई पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather Update: आज राज्यभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल. उद्यापासून पुढील चार दिवस 7 जिल्ह्यांसाठी अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात आज मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, आज राज्यभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल. उद्यापासून पुढील चार दिवस 7 जिल्ह्यांसाठी अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई वगळता संपूर्ण कोकणात आज मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबई आणि उपनगरात रिमझिम सरींचा अंदाज आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल. 30-40 किमी वेगाने वारे वाहतील. उद्यापासून चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट आहे. समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उत्तर महाराष्ट्रात स्थिती
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
पुण्यात आजपासून चार दिवस जोरदार पावसाचा इशारा नाही, मात्र रिमझिम पाऊस सुरू राहील. घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे. कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथा भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील.
विदर्भ व मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर
विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर अधिक राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बीडमध्ये मध्यरात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी
बीड जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसाने सर्वत्र ओलावा निर्माण झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात सलग रिपरिप सुरू असल्याने वातावरण आनंदी आणि गारठलेले आहे. या पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. काही भागात पावसाच्या जोरामुळे रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीत किरकोळ अडथळे निर्माण झाले आहेत. शेतकरी वर्गाने पेरणीनंतरच्या पुढील कामांसाठी तयारी सुरू केली असून, या पावसामुळे खरीप हंगाम यशस्वी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस, रात्रीपासून सर्वत्र पावसाची संततधार सुरू
परभणीत अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज स्वातंत्र्य दिनी सर्वत्र जोरदार पाऊस बरसतोय, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली, रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती पहाटेपासून मात्र पावसाचा जोर वाढला आहे. विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसत असल्याने आज स्वातंत्र्य दिनी झेंडावंदन कार्यक्रमात पावसाचे सावट पसरले आहे.























