Maharashtra Weather Update:उष्णतेची लाट विरली;आता विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
पुढील पाच दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Maharashtra Weather Update: राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पासूनच उष्णतेच्या लाटांना सुरुवात झाली .मुंबई सह कोकणपट्ट्यात प्रचंड उष्णता आणि दमट हवामानाचा फटका नागरिकांना बसला . ही लाट हळूहळू विदर्भाकडे सरकली . गेल्या आठवडाभरापासून विदर्भात उन्हाच्या चटक्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत . बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे होता . उत्तर महाराष्ट्रात सह मध्य महाराष्ट्रातही तापमानाने उच्चांक गाठला .विदर्भातील उष्णतेच्या लाटा आता विरल्या आहेत .हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात विदर्भात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे . (Rain Alert)
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या वाऱ्यांचा आणि मध्य भारतातील वाऱ्यांच्या एकत्रित प्रभावामुळे सध्या ईशान्य भारताकडून खाली मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे .
याचा प्रभाव विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर होण्याचीही शक्यता आहे . सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती तसेच पश्चिमी चक्रावताचा प्रभाव छत्तीसगड ते विदर्भाच्या भागात सक्रिय आहे .
काय दिलाय हवामान विभागाने अंदाज ?
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार,पुढील पाच दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस होणारा असून विदर्भातील काही जिल्ह्यांना येत्या दोन दिवसात म्हणजेच 21 मार्च व 22 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे .यावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे .
कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट ?
शुक्रवार 21 मार्च रोजी वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.22 मार्च रोजी वाशिम , नागपूर , भंडारा , चंद्रपूर , गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .
दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज पासून (18 मार्च)धाराशिव जिल्ह्यात तुरळीक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे .19 व 20 मार्चला छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे .तर 21 मार्चला परभणी हिंगोली व नांदेड जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे .
मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तापमानात येत्या 24 तासात फारसा फरक जाणवणार नसल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे .त्यानंतर हळूहळू दोन ते तीन अंशांनी तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय .कोकणपट्ट्यात येते तीन ते चार दिवस कोणताही तापमान बदल जाणवणार नाही .
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

