(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Weather : राज्यात पुढचे दोन दिवस थंडीचा जोर कमी राहणार, किमान तापमानात वाढ, कोकणात ढगाळ वातावरण
पुढचे दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थंडीचा जोर काहीसा कमी होणार आहे.
Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर (Cold weather) वाढला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे चित्र आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान, पुढचे दोन दिवस म्हणजे पाच डिसेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थंडीचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केली आहे. सदर तापमान वाढ कदाचित डिसेंबरचा पहिला आठवडा संपेपर्यंत म्हणजे सात ते आठ डिसेंबरपर्यत जाणवू शकते.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जाणवणार
उत्तर भारतातील स्थिरावलेल्या किमान तापमानामुळं महाराष्ट्रात सुद्धा अपेक्षित असलेल्या किमान तापमानाच्या घसरणीला ब्रेक जाणवत आहे. महाराष्ट्रात कमाल तापमानात विशेष फरक जाणवण्याची शक्यता जाणवत नाही. राज्यात पुढचे दोन दिवस थंडीचा जोर कमी होणार असताना दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जाणवणार असल्याची शक्यता देखील माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
दाट धुक्यात हरवली गावं, रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता
मराठवाड्यात तापमानाचा पारा घसरला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहेय तिथेही ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. मराठवाड्यात तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. सध्या मराठवाड्यात आठ ते 10 अंश सेल्सिअस तापमान आहे. औरंगाबाद गंगापूर तालुक्यात ग्रामीण परिसरात आज पहाटे सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली होती. पसरलेल्या दाट धुक्यात गाव आणि शेत-शिवार हरवल्याचे चित्र पाहावयास मिळाले. धुक्याची चादर इतकी दाट होती की, 10 ते 15 फुटावर दिसणेही मुश्किल झाले होते. पहाटेपासून पसरलेल्या दाट धुक्याच्या चादरीमुळे सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान सूर्यदर्शन झाले. या धुक्यामुळे रब्बी पिकावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळ शेतकरी चिंतेत आहेत.
नागपुरात थंडीचा जोर वाढला
नागपूर शहरातही थंडीचा जोर वाढला आहे. तापमानाचा पारा घसरला असून हवेतील गारवा वाढला आहे. सामान्यतः चालू डिसेंबर महिन्यात रात्रीचा पारा घसरण्याचे सत्र सुरु होते. त्यामुळं कडाक्याची थंडी वाढते. डिसेंबरमध्ये सामान्यत: दिवसाचे कमाल तापमान सरासरी 28.9 अंशांच्या आसपास आणि रात्रीचे किमान तापमान सरासरी 12.9 अंशांवर असते. गेल्या दशकभरात नागपूरचा रात्रीचा पारा सातत्याने आठ अंशांच्या खाली घसरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: