सप्टेंबरच्या पावसाने दिलासा, अनेक धरणांच्या जलसाठ्यात वाढ; मात्र गेल्या वर्षी 100 टक्के भरलेल्या उजनीत यंदा केवळ 33 टक्केच पाणी
मागील वर्षी उजनी धरणात 100 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा उजनी धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन जलसंपदा विभागाला करावे लागणार आहे.
मुंबई : जून सरला तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वच विभागातील धरणं तळ (Water Crisis) गाठू लागली. मात्र दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात उत्तरा नक्षत्रातील पाऊस धो-धो बरसल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.सप्टेंबर महिन्यात झालेल्या चांगल्या पावसानं महाराष्ट्रातील धरणक्षेत्रातील जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. दरम्यान, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काहीसा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाचा जोर ओसरल्याचे पाहावयास मिळाले आहे.
उजनीत यंदा केवळ 33 टक्केच पाणी
जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र विश्रांती घेतली. आधीच असलेली तूट आणि वाढत जात असलेल्या तापमानामुळे राज्यातील धरणांनी तळ गाठला. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जवळपास नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील धरणक्षेत्रात 73.56 टक्के पाणीसाठा झाला आहे. 4 सप्टेंबर रोजी राज्यातील धरणक्षेत्रात 64.77 टक्के पाणीसाठा होता. उजनी धरणात 4 सप्टेंबर रोजी 17 टक्के पाणीसाठा होता तोच आज 33 टक्के जलसाठा झाला आहे. दरम्यान, मागील वर्षी उजनी धरणात 100 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा उजनी धरणातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन जलसंपदा विभागाला करावे लागणार आहे.
जायकवाडीत धरणात 44.34 टक्के पाणीसाठा
मराठवाड्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडीत धरणात 44.34 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याचवेळी 99.71 टक्के जलसाठा होता . औरंगाबादेतील धरणक्षेत्रात सर्वात कमी पाणीसाठा आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 38.67 टक्के पाणी आहे. मागच्या वर्षी औरंगाबाद विभागात 86.11 टक्के जलसाठा होता. नागपूर विभागातील धरणक्षेत्रात 89.54 टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागात 81.17 टक्के, नाशकात 76.02 टक्के, तर पुण्यात 77.47 टक्के पाणीसाठा आहे. कोकणात मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोकण विभागात यंदा 94.29 टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी 90.30 टक्के जलसाठा आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कोकण वगळता सर्व विभागांतील धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. मराठवाडा, विदर्भातील धरणांमध्ये सरासरी पाणीसाठा आहे. परिस्थिती गंभीर नसली तरी पाणीसाठा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार 1 जूनपासून आत्तापर्यंत देशात सरासरीच्या 94 टक्के पाऊस झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 96 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या आठवड्यात राज्यातून मान्सून माघारी परतण्यास सुरुवात होणार आहे.
हे ही वाचा :