Maharashtra SSC, HSC Exam Date 2021: दहावी, बारावी परीक्षांची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता
या आठवड्यात दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षांची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षांच्या आयोजनासंबंधी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (Maharashtra State board) अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.
मुंबई: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. तशा प्रकारचे संकेत महाराष्ट्र राज्य बोर्डचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिले आहेत.
दहावीच्या परीक्षा मे महिन्यात तर बारावीच्या परीक्षा या 15 एप्रिल नंतर घेण्यात येतील असं बोर्डच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं. या संबंधिची सर्व तयारी पूर्ण झाली असून या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखेची घोषणा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना त्यासंबंधी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या दृष्टीने तारखा जाहीर करण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या आधी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा या अनुक्रमे 1 मे आणि 15 एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
दिनकर पाटील म्हणाले की, "बोर्डाकडून नुकतंच पुरवणी परीक्षेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सुमारे दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी भाग घेतला. ही पुरवणी परीक्षा सुरळीत पार पाडण्यात बोर्डाला यश आलं. या परीक्षेचा निकाल दोन आठवड्याच्या आत जाहीर करण्यात आला."
दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येतात. यामध्ये दहावीच्या परीक्षेसाठी दरवर्षी जवळपास 17 लाख विद्यार्थी तर बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास 13 लाख विद्यार्थी बसतात. पण कोरोनाच्या संक्रमणामुळे या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळाने घेतल्या जातील हे स्पष्ट होतं.
दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आज 11 जानेवारी ही अंतिम मुदत होती. आता ही अवधी 25 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पहा व्हिडीओ: SSC Exam |विद्यार्थ्यांना दिलासा! दहावी बोर्ड परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ,25 जानेवारीपर्यंत अवधी
MPSC कडून विविध पदांच्या पूर्व परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर