(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samrudhhi Highway : समृद्धी महामार्गावरील अपघात चिंतेचा विषय, मात्र यावर मार्ग कधी निघणार?
Samrudhhi Highway : समृद्धी महामर्गावरील अपघातांसदर्भात धक्कादायक माहिती समोर आली असून यावर तोडगा कधी काढणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
Samrudhhi Highway : समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांवर (Accident) अनेक उलगडे होत आहेत. मात्र जास्तीत जास्त अपघात हे वाहन चालकाला झोप लागणे किंवा वाहन चालक रोड हिप्नोसिसचा शिकार झाल्याने होत असल्याची माहिती समोर आली आहे. पण एवढं सगळं समोर आलं असताना यावर सरकार कोणतीही उपाययोजना करताना दिसत नसल्याचं म्हटलं जात आहे.
विदर्भाला राजधानी मुंबईशी जोडण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेला हा समृद्धी महामार्ग (Samrudhhi Highway) आहे. जवळपास साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा महामार्गाची ओळख आता मृत्यूचा सापळा म्हणून ओळख व्हायला लागली आहे. नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा सरळसोट असलेला हा महामार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहन चालवताना वाहन चालक हे रोड हिप्नोसिसचे शिकार होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
मागील आठवड्यात बुलढाण्यातील खालगी लक्झरी बसला झालेल्या अपघातानंतर अनेक अहवाल समोर आले होतं. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे अपघाताचे कारण हे रोड हिप्नोसिस देण्यात आले होते. वाहन चालक सलगपणे वाहन चालवताना रोड हिप्नोसिसचा शिकार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेत. त्यामुळे चालकाला डुलकी येणे किंवा झोप येणे हे स्वाभाविक आहे. अपघातांचे प्रमाण देखील वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे.
या महामार्गावर वाहन चालवत असताना " ब्रेक थ्रू जर्नी " आवश्यक आहे. त्यासाठी वाहन चालकांना थांबण्यासाठी जागा किंवा फ्रेश होण्यासाठी रोडसाइड अॅमेनिटीची आवश्यकता आहे. असं जरी तज्ज्ञ सांगत असले तरी मात्र सरकारला या गोष्टीची जाणीव नाही का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
समृद्धी महामार्गावर गेल्या सहा महिन्यात घडलेले अपघात
या महामार्गावर गेल्या सहा महिन्यात जवळपास एक हजाराच्यावर अपघात घडले आहेत. तर यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला आहे. चालकला झोप येणे किंवा डुलकी लागणे यामुळे 183 अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. तर टायर फुटल्यामुळे 51 अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे या महामार्गावर आतापर्यंत 200 अपघात झाले असून त्यामध्ये जवळपास 41 जणांचा बळी गेला आहे.
सरकारकडून दुर्लक्ष?
सरकारकडून समृद्धी महामार्गावर रोडसाइड अमेनिटीज बनवण्यासाठी आतापर्यंत तीनदा टेंडर काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तीनही टेंडर हे प्रशासकीय कारणावरून रद्द करण्यात आल्याची धक्कादायक माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. इतकंच काय तर बुलढाण्यात खाजगी बसचा अपघात झाल्या नंतर सरकार ने दुसऱ्याच दिवशी सरकारने चौथ टेंडर काढल्याची माहिती देखील मिळाली पण हे टेंडर पाच दिवसांनी प्रशासकीय कारणावरून रद्द करण्यात आल्याचं देखील सूत्रांनी म्हटलं आहे. मुंबईतील एका कंपनीला हे टेंडर देण्यात आलं होतं आणि ते मंजूर देखील करण्यात आलं होतं.
समृद्धी महामार्ग हा जरी राज्याची भाग्य रेषा बदलणारा महामार्ग असला तरी मात्र यावरील होणाऱ्या अपघाताच प्रमाण बघता आता तरी सरकारने जागे होणे आवश्यक आहे. या महामार्गावर जर सोयीसुविधांसाठी तीन वेळेस टेंडर निघून रद्द होत असेल तर हे नेमकं कशासाठी होत असेल हा प्रश्न देखील आता नागरिकांच्या मनात उपस्थित केला जात आहे.