सोलापूर : राज्य सरकारने द्राक्षापासून तयार होणारी वाईन सुपरमार्केट विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर त्यावरुन चांगलाच गोंधळ सुरु झाला आहे. अनेकजण शेतकऱ्यांना या निर्णयामुळे फायदा होईल, असं सांगत आहेत. तर विरोधी पक्ष याला कडाडून विरोध करत आहेत. सध्या हे राजकीय द्वंद्व सुरु झाल्याचं चित्र दिसत आहे. अशात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापुरात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. 
 
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे की, आम्ही कुणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही, म्हणणारही नाही. मद्यपान करु नये हाच महत्वाचा विषय आहे. तरीसुद्धा जगात सिगारेटसारख्या वस्तू सूचना देऊन विकल्या जातात.  मद्यपानाला आरोग्य विभाग कधीही प्रोत्साहन देऊ शकत नाही.  शेतकरी, द्राक्ष बागायतदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे, असं टोपे म्हणाले.


टोपे म्हणाले की, वाईन उद्योगामुळं शेतकरी, द्राक्ष बागायतदारांचं उत्पादन वाढावं म्हणून हा निर्णय घेतला आहे. जे उत्पादन होतं त्या विक्रीसाठी एक योग्य मार्केटिंगच्या संदर्भानं एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आरोग्य विभाग मद्यपानाला कधीच प्रोत्साहन देणार नाही, असंही ते म्हणाले. 


काल रात्री पंढरपुरात बोलताना राजेश टोपे म्हणाले होते की, Neocov हा नवा व्हेरीएंट बाबत चायनाच्या वूहान मध्ये चर्चा झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO याचा अभ्यास करत आहे . प्राथमिक माहिती नुसार याचा मृत्युदर हा लागण झालेल्या रुग्णांच्या एक तृतीयांश असल्याची माहिती मिळत आहे. Neocov हा व्हेरियंट इतर व्हेरियंटच्या तुलनेत जास्त गतीने फैलाव होते. दिलासादायक बाब म्हणजे, Neocov या व्हेरियंटची अद्याप जगामध्ये कुठेही लागण झाल्याची माहिती नाही.'  आ प्राथमिक माहितीनुसार काही जिल्ह्यात कोरोना कमी होत असताना काही जिल्ह्यात वाढतानाही दिसत आहे. परंतु तज्ञांच्या मतानुसार मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट संपुष्टात येऊ शकते. मार्चपासून आपण कोरोनाच्या अस्ताकडे जाऊ शकतो, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha