Neocov Virus Variant : ओमयक्रोन व्हेरियंटचा सामना करत असताना जगावर आणखी एका कोरोना व्हेरियंटचं संकट समोर आले आहे. चीन संशोधकांनी निओकोव्ह (Neocov) नावाचा नवा कोरोना विषाणू संदर्भातील माहिती एका रिसर्चमध्ये समोर आणली आहे. हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतील वटवाघुळमध्ये आढळत असल्याचं म्हणणं आहे. Neocov या व्हेरियंटबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, 'Neocov हा नवा व्हेरीएंट बाबत चायनाच्या वूहान मध्ये चर्चा झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO याचा अभ्यास करत आहे . प्राथमिक माहिती नुसार याचा मृत्युदर हा लागण झालेल्या रुग्णांच्या एक तृतीयांश असल्याची माहिती मिळत आहे. Neocov हा व्हेरियंट इतर व्हेरियंटच्या तुलनेत जास्त गतीने फैलाव होते. दिलासादायक बाब म्हणजे, Neocov या व्हेरियंटची अद्याप जगामध्ये कुठेही लागण झाल्याची माहिती नाही.' आरोग्यमंत्री राजेश टोपे शनिवारी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्राथमिक माहितीनुसार काही जिल्ह्यात कोरोना कमी होत असताना काही जिल्ह्यात वाढतानाही दिसत आहे. परंतु तज्ञांच्या मतानुसार मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट संपुष्टात येऊ शकते. मार्चपासून आपण कोरोनाच्या अस्ताकडे जाऊ शकतो, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
मास्कमुक्ती बाबत सध्या राज्यात कोणताही विषय अथवा चर्चा नसल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यात सध्या दोन लाखांच्या घरात रुग्ण असले तरी एखादा टक्का रुग्णांना ऑक्सिजन लागत आहे. केवळ पाच टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत . बाकीचे ९५ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. हॉस्पिटलचे ९५ टक्के बेड मोकळे असल्याने आज घाबरण्यासारखी परिस्थिती नाही, असेही टोपे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून काही निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे म्हणत निर्बंध शिथिल होण्याचे संकेतही यावेळी टोपे यांनी दिले.
इतर देशात ज्या पद्धतीने निर्बंध शिथिल केले जात असून मास्क वापर बंद केले आहेत, यामागच्या कारणांचा अभ्यास करणार असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. पंढरपूर येथे मंदिर समितीसोबत टाटा एक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात माझ्यासोबत दोन बैठक झाल्या आहेत, लवकरच याबाबत निर्णय होईल असे टोपे यांनी सांगितले.