Beed Organic Farming : रासायनिक खताचा वापर शेतीमध्ये दिवसेंदिवस वाढत असतानाच या रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीचा पोत खराब होऊ लागला आहे. हीच शेती पुन्हा कसदार व्हावी म्हणून बीडमधल्या एका तरुणाने गांडूळ निर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. या गांडूळाचा उपयोग केवळ बीड जिल्ह्यातीलच नाही तर अगदी परदेशातील शेतकऱ्यांना सुद्धा होऊ लागला आहे. बीडमधील या गांडूळ प्रकल्पाची महती पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्टमध्ये... 


बीडमधील नेचर ॲग्रोटेक अर्थात सेंद्रिय शेतीची प्रयोगशाळा होय. याच ठिकाणी सेंद्रिय शेती संदर्भातला संशोधन मागच्या सहा वर्षापासून सुरू आहे. सेंद्रिय शेतीच्या कामांना झपाटलेल्या अमरनाथ आंदुरे या तरुणाने उभारलेले हे काम आता परदेशात जाऊन पोहोचलय. पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे सुरू केलेल्या नेचर ॲग्रोटेक मधून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे मिळू लागले आहेत.


गांडूळ खताची मागणी वाढत गेल्याने पुण्यामध्ये अमरनाथ यांनी नेचर ॲग्रोटेक नावाची कंपनी स्थापन केली. आपल्या या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी भारतातच नाही तर विदेशात देखील गांडूळ खत आणि गांडुळाची निर्यात केली आहे. कंपोस्ट खत तयार करणाऱ्या जिवंत गांडुळाची मागणी परदेशातून सध्या होत आहे. हीच गरज लक्षात घेऊन अमरनाथ यांनी उमान या देशात आठ लाख रुपये किमतीच्या चार टन गांडूळाची निर्यात केली आहे. 




अमरनाथ यांनी आपल्या स्वतःच्या शेतात तयार केलेल्या गांडूळ खत प्रकल्प सहा वर्मी बेड ठेवण्यात आले आहेत.  या वर्मी बेडमध्ये कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. या प्रकल्पामध्ये त्यांच्या आई आणि भाऊ हे दोघे मिळून काम करतात. अमरनाथ यांच्या पत्नी खताची आणि गांडूळाची  विक्री करण्यासाठी त्यांची मदत करतात. या ठिकाणी तयार झालेले खत ते स्वतःच्या शेतात वापरतात. ऑर्डरप्रमाणे इतर शेतकऱ्यांना देखील या खताची विक्री केली जाते. त्यामुळे या परिसरात आता मोठ्या प्रमाणात शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत.


उच्चशिक्षित असलेल्या अमरनाथ यांनी शेतामध्ये सुरू केलेला हा खताचा व्यवसाय आता विदेशात देखील पोहोचलाय. या प्रकल्पातून तयार होणारे खत जिवंत गांडूळ आणि वर्मी बेड याच्या विक्रीतून ते महिन्याला चार ते पाच लाख रुपयांची मिळकत करतात तर या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांना रोजगार देखील निर्माण झाला आहे. नेचर अग्रोटेक मधून तयार होणारे हे गांडूळ केवळ शेतीत कसदार करायचं काम करतात. असे नाही तर अनेक वेळा माशाच्या खाद्यासाठी तर पंचतारांकित मोठ्या हॉटेल्स मध्ये शिल्लक राहिलेल्या अन्नाचे कंपोस्ट तयार करण्यासाठी सुद्धा या गांडुळाचा उपयोग होऊ लागला आहे.