Mama Bhosale : महिलेवरील अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या मनोहर (मामा) भोसलेला (Manohar Bhosale) बार्शी सत्र न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केला आहे. मनोहर भोसले विरोधात बारामती येथे आर्थिक फसवणूक संदर्भात तर करमाळा येथे अत्याचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सप्टेंबर 2021 पासून तो अटकेत होता. सध्या मनोहर भोसले यांच्यावर अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी तपास पूर्ण करत आरोपपत्र दाखल केलेले होते. त्यामुळे मनोहर भोसले यांच्यावतीनं जामीनसाठी अर्ज करण्यात आलेला होता. काही अटी शर्थींवर जवळपास 132 दिवसानंतर मामाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मामाचा जामीन मंजूर करताना न्यायालयाने फिर्यादी महिलेच्या सातारा जिल्ह्यात जाण्यासाठी मनाई केली आहे. जामीन मिळाल्यानं उपचार सुरू मनोहर भोसलेला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, बाळूमामा यांचा भक्त म्हणून मामा भोसलेंनी ओळख बनविल्यानंतर मोठ्या शहरात अध्यात्मिक गुरू म्हणून समोर येऊ लागलेल्या मनोहर मामा यांच्या विरोधात आदमापूर देवस्थान आणि ग्रामस्थांनी मोहीम सुरु केली होती. त्यामुळे मामांच्या अडचणी वाढल्या होत्या. यापुढे करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे बेकायदेशीर आश्रम चालू न देण्याचे आवाज उठू लागले होते. याच मनोहर भोसले यांच्या विरोधात दोन तक्रारी करमाळा पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या होत्या.
पुणे, मुंबई, नाशिक अशा मोठमोठ्या शहरातील राजकारणी, व्यापारी, उद्योजक दर अमावास्येला या उंदरगाव येथील अडचणीच्या ठिकाणी असलेल्या मनोहर मामा यांच्या मठात येत असत. अमावस्येल शेकडो वाहने ग्रामस्थांच्या पिकात उभी राहू लागल्यानं नाराजीला सुरुवात झाली होती. येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी पावत्या फाडल्या जाऊ लागल्या आणि भाविकांना चमत्कार दिसू लागल्यानं या छोट्याशा मठात हजारो भाविकांची गर्दी होऊ लागली. उजनीच्या बॅक वॉटरमुळे समृद्ध असलेल्या उंदरगाव ग्रामस्थांना याचा त्रास वाढू लागल्यावर मामांचा मावस भाऊ धनंजय कांबळे यांनी पुढाकार घेत आवाज उठवला आणि ग्रामस्थही इतक्या वर्षात पहिल्यांदा विरोधात उभे राहिले.
अदमापूर देवस्थान आणि ग्रामस्थांनी मनोहरमामा यांच्या विरोधात मोहीम सुरु केल्यानं मामांच्या अडचणी वाढल्या. आपण बाळूमामा यांचा वंशज, शिष्य नसून केवळ भक्त असल्याचा खुलासा मनोहरमामा यांना करावा लागला. यानंतर मनोहर मामा यांचेवर सध्याच्या माठासाठी घेतलेल्या जमीन खरेदीत फसवणूक झाल्याची तक्रार एका महिलेने करमाळा पोलिसांत दिली. यानंतर बारामती येथील रवींद्र म्हेत्रे यानं आपल्या पत्नीचं आजारपण दूर करतो म्हणून पैसे घेतले आणि ती बरी न झाल्यानं आपली फसवणूक केल्याची दुसरी तक्रार मनोहरमामा यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात दिली होती. यातील म्हेत्रे यांच्यावर मनोहरमामा यांनी यापूर्वीच खंडणी आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, मनोहरमामा यांचा उभारत असलेल्या मठाला उंदरागाव ग्रामपंचायतीची मान्यता नसल्याचंही समोर आल्यानं मामांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आता या मठामुळं सर्वसामान्य ग्रामस्थांना त्रास होत असल्यानं ग्रामस्थ हा मठ इथे चालू देणार नसल्याचं मामांचे मावसभाऊ धनंजय कमावलं यांनी सांगितलं होतं. सध्या कोरोनामुळे हा मठ बंद असून मनोहरमामा देखील उंदरागाव परिसरात नसले तरी आता भक्तीच्या नावाखाली सुरु असलेल्या या मठाचा वाद पोलीस आणि न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. गोरगरीब भाविकाला देव सध्या दगडालाही सापडतो आणि तो त्याला आयुष्य जगण्याचं सुख समाधान मिळवून देतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Balu Mama : लोकसंत बाळूमामांच्या भक्तांमध्ये बेबनाव, अखेर मनोहर मामा भोसलेंविरोधात तक्रार दाखल, प्रकरण नेमकं काय?
- बाळूमामांच्या नावावर काही मंडळी पैसे गोळा करत असल्याने निषेधाचा ठराव, भक्तांमध्ये बेबनाव, काय आहे प्रकरण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha