कोल्हापूर :  शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शेती पंपाच्या थकीत बिलाची वसुली सुरू असल्याचा प्रकार घडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीतील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने उसाच्या बिलातून वीज बिलाची वसुली करत उत्पादकाला बील दिले आहे. परस्पर वीज बील वसुली केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना साखर कारखान्याविरोधात आक्रमक झाली आहे. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना जवाहर शेतकरी साखर कारखान्याचा दारात आंदोलन करणार आहे.  


कोल्हापूर जिल्ह्यातील अभिजीत पाटील या शेतकऱ्याचा ऊस जवाहर सहकारी साखर कारखान्याला गेला होता. यावेळी त्यांच्या ऊस बिलातून वीज बिलाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. या प्रकाराचा शेतकरी अभिजीत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. एकीकडे खतांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. महापुराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, अशातच आता जवाहर कारखान्याने उसाच्या बिलातून वीज बील कपात केली आहे. माझी सहमती नसताना कारखान्याने बीज कपात केले आहे. त्यामुळे मी जवाहर सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र सरकार आणि महावितरण कंपनीचा जाहीर निषेध करत असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.




दरम्यान, याप्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. वीज न वापराताही बिले आली आहेत. अनेक ठिकाणी मीटर बंद आहेत. अनेक ठिकाणी तेवढी वीज वापरली नसतानाही वाढीव बिले आली आहेत. बिले दुरूस्त करण्याची आम्ही वेळोवेळी मागणी केली होती. काही ठिकाणी बिले दुरूस्त केल्यावर शेतकऱ्यांनी बिले भरली देखील असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले. परस्पर वीज बिल कपात करण्याचा धडाका महावितरणने सुरू  केला आहे. हे चुकीचे आहे. हे बेकायदेशीर असल्याचे शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय बिल कपात करता येत नाही. परस्पर पैसे वसूल केले तर त्या कारखान्यांच्या विरोधात आणि कारखान्याच्या चेअरमन विरोधीत आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे.


दरम्यान, अभिजीत पाटील यांनी जवाहर कारखान्याला त्यांचा ऊस घातला होता. त्यानंतर त्या बिलातून त्यांचे वीज बिल कपात करण्यात आले आहे. वीज बिल कपात केल्याची पावती सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. दरम्यान, शेतकर्याने या प्रकाराचा निषेध केला आहे. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. थेट कारखान्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: