(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : पुढील 2 महिन्यात राज्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : पुढील दोन महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain Update : हवामान विभागाकडून ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान देशात 95 ते 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर ऑगस्टमध्ये संपूर्ण देशात 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट महिना पाहता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस दिसून येतो आहे. मात्र, पुढील दोन महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांच्याकडून पत्रकार परिषद घेत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाजआहे. मात्र, महाराष्ट्रात 25 टक्के अधिक पाऊस झाला.
दरम्यान, जुलै महिन्यात हवामान विभागाकडून दुसऱ्या पंधरवाड्यात मोठा पाऊस होईल अशा अंदाज दुसऱ्या मॉडेलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला. भारतीय हवामान विभागाकडून हा एक नवा प्रयोग केला जात आहे. ज्यात दर महिन्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज वर्तवला जातो आहे. ज्याचा ह्यावर्षी हा पहिलाच प्रयोग आहे.
ऑगस्ट महिन्याचा अंदाज बघितला तर कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी सरासरी गाठताना बघायला मिळत आहे. मात्र, मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीत देखीलसरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे, हवामान विभागाकडून मॉन्सूनच्या उत्तरार्धात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोलीतल्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो.