Maharashtra Rain Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत
राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे. रात्रभर मुंबईत पावसाची रिपरिपस सुरु होती. त्यानंतर सकाळपासून मुंबईसह, ठाणे परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं हजेर लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात देखील हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या चार तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद , मोताळा , संग्रामपूर ,शेगाव , खामगाव तालुक्यात दुपारी दोन वाजेपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्याला मोठा प्रवाह, मागील 24 तासांतील मुसळधार पावसाने धबधब्याला जोर
बदलापूरजवळच्या कोंडेश्वर धबधब्याला मागील 24 तासंपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठा प्रवाह आलाय. या धबधब्याने रौद्ररूप धारण केलं असून धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झालीय.
बदलापूरजवळच्या कोंडेश्वर इथं मंदिराच्या बाजूला दोन धबधबे असून दरवर्षी पावसाळ्यात या धबधब्याला मोठा प्रवाह असतो. बदलापूर शहर आणि आसपासच्या परिसरात गेल्या 24 तासात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोंडेश्वर धबधब्याला मोठा प्रवाह आला आहे. धबधब्याचं हे रौद्ररूप पाहण्यासाठी पर्यटक मोठ्यास संख्येनं गर्दी करतायत.
Parbhani News : परभणीत पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी
Parbhani News : तीन दिवसांचा खंड पडल्यानंतर परभणीत पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 1 तासापासून सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक भागात पाणीच पाणी झाले असून छोट्या मोठ्या नदी नाल्या ओसंडून वाहत आहेत. जिल्हाभरातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सुरू असलेल्या या पावसामुळे पुन्हा एकदा या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत
मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर धीमी लोकल दहा ते 15 मिनीटांनी उशिराने धावत आहे. तर याच मार्गावरील जलद लोकल 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. हार्बर मार्गावर दहा मिनिटे उशिराने लोकल धावत आहे. तर वेस्टर्न मार्गावर 5 ते 10 मिनीटे लोकल उशिराने धावत आहे.
कल्याण डोंबिवलीला मुसळधार पावसाने झोडपले, सखल भागातील रस्त्यावर पाणी
कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवलीतील आजूबाजूच्या परिसराला अक्षरशः झोडपून काढलंय. त्यामुळे कल्याण डोंबिवली मधील अनेक सखल भागात पाणी शिरले. कल्याण मधील संत तुकाराम नगर, वालधुनी परिसर डोंबिवली मधील स्टेशन परिसर, नांदिवली या भागांमध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचलंय. मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसलाय. या मुसळधार पावसामुळे कल्याण रेल्वे स्थानकावर रुळांवर पाणी आलं होतं. त्यामुळे रेल्वे वाहतूक ही मंदावलेली दिसून आली. कल्याण नगर महामार्गावरील वरप ते कांदा दरम्यान रस्त्यावर गुडघाभर पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या.