Maharashtra Rain : आज राज्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता, उद्यापासून महाराष्ट्रात उघडीप होण्याचा अंदाज
आजही राज्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
Maharashtra Rain : राज्यातील विविध जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यात मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. तर दुसरीकडं अहमदनगर, नाशिक, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आजही राज्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तर 22 ऑक्टोबरपासून म्हणजे उद्यापासून मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात स्वच्छ सूर्यप्रकाशसहित उघडीपीची शक्यता असल्याचे अंदाज खुळे यांनी व्यक्त केला.
नेमकं काय म्हणालेत माणिकराव खुळे
मुंबईसह कोकणात मात्र रविवार 23 ऑक्टोबर पर्यंत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 22 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. त्यामुलं दिवाळीत पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे.
रब्बी बीज रोवणीचा निर्णायक कालावधी
बंगालच्या उपसागरात निर्माण होऊ पाहणाऱ्या चक्री वादळाचा महाराराष्ट्राला कोणताही धोका नाही. सदर चक्रीवादळ ' पाडवा-भाऊबीज ' नंतर (26 लऑक्टोबर) ओरिसाच्या किनारपट्टीला बगल देऊन पश्चिम बंगाल आणि बांगलादेशकडे निघून जाण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा सध्याचा खरीप पीक काढणी आणि रब्बी बीज रोवणीचा निर्णायक कालावधी आहे. दरम्यान, दूर अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या दापोली समोरील ते लक्षद्विपच्या पश्चिम किनारपट्टी दरम्यान असलेल्या पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाबाच्या पट्टा (आस, Trough) ह्या इतर बरोबर मुख्य प्रणालीमुळेच सध्या इतर राज्याबरोबर महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे.
लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस
लातूर जिल्ह्यात देखील परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामुळं सोयाबीनची रास करणंही अवघड झालं आहे. काल (21 ऑक्टोबर) संध्याकाळपासूनच लातूर शहर आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरण तयार झालं होतं. संध्याकाळच्या सुमानाचे जवळपास एक तास पावसानं जोरदार हजेरी लावली होती. चार साडेचार तासाच्या उसंतीनंतर पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. रात्री दहानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, मागील तीन ते चार दिवसापासून पावसानं उसंत घेतली होती. आता कुठे शेत शिवारातील ओल कमी होत होती. पाण्याचा निचरा झाल्यानंतर सोयाबीन वाळल्यानंतर रास करण्यासाठी अनेक शेतकरी वाट पाहत होते. मात्र, या पावसानं त्यांची रास करण्याची वेळ अक्षरशः खूप पुढे नेली आहे. यामुळं सोयाबीन बाजारात घालणं शक्य नाही. त्यामुळं हातात नकदी पैसा नसल्यानं याचा सगळा प्रभाव दिवाळीच्या सणावर पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: