(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bypoll Election : पुण्यात मनसेला मोठं खिंडार; सात जणांच्या हकालपट्टीमुळे 50 मनसैनिकांचा पक्षाला 'राम राम'
पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेच्या 7 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे 50 मनसैनिकांनी आपले राजीनामने दिल्याची माहिती आहे.
Pune Bypoll election : पुण्यात सध्या (Pune Bypoll Election) पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशातच पुण्यात मनसेला (MNS) मोठं खिंडार पडलं आहे. मनसेच्या 7 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे 50 मनसैनिकांनी आपले राजीनामने दिल्याची माहिती आहे. मनसेने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र मनसेच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी मविआच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली. एकाचवेळी 50 पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
पुण्यातील कसबा निवडणुकीत मनसेने भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. कसब्याचे कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या प्रचारात काही मनसैनिक सामील झाले होते. धंगेकरांचा प्रचार करत असल्याची माहिती पक्षातील स्थानिक नेत्यांना मिळाली. त्यामुळे शहराध्यक्षांनी पत्र काढत 7 जणांची हकालपट्टी केली. त्यानंतर थेट 50 जणांनी राजीनामे दिले आणि धंगेरकांचा प्रचार करण्याची भूमिका घेतली. कसबा पोटनिवडणुकीत मनसेनं भाजपला पाठिंबा दिलेला आहे. मात्र प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. भाजपच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतं मिळतील याचा वैयक्तित पातळीवर प्रयत्न करा, असं मनसेकडून सांगण्यात आलं होतं.
या पदाधिकाऱ्यांची मनसेकडून हकालपट्टी
कसब्यात महाविकास आघाडीचा प्रचार केल्याप्रकरणी मनसेनं रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे आणि नीलेश निकम यांची हकालपट्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी केली होती. त्यानंतर मनसेच्या 50 कार्यकर्त्यांनी पक्षातील पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. मनसैनिकांच्या या भूमिकेमुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
भाजपला पाठिंबा दिल्याने कार्यकर्ते नाराज?
पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून मनसे नेमकं कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र मनसैनिक प्रचार करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार मनसैनिक प्रचारात सहभागी न होता वैयक्तित पातळीवर भाजपचं मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे, असं मनसैनिकांना सांगण्यात आलं होतं. मनसेनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांची प्रचारयात्रा थेट पुण्यातील मनसेच्या कार्यालयात धडकली होती. त्यावेळी शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे नेते बाबु वागस्कर यांनी धंगेकरांचं जय्यत स्वागत केलं होतं. त्यानंतर पुण्यात चर्चेला उधाण आलं होतं. आता राजीनामा दिल्यानंतर भाजपला पाठिंबा दिल्याने कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा आहे.