Deepak Kesarkar : हे खरंच ईडीचं सरकार, पण ईडी म्हणजे.... - दीपक केसरकर
Deepak Kesarkar : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत रागाने वक्तव्य काढले आहे. त्यांच्या कोणत्याही स्टेटमेंटला आम्ही उत्तर देणार नाही.
Deepak Kesarkar : हे खरंच ईडीचं सरकार आहे. पण ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आहेत. संजय राऊत ज्या चौकशीला गेलेत ती ईडी वेगळी आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केलेय. ते गोव्यातून बोलत होते. यावेळी केसरकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
मंत्रीपदाबाबतची कोणतीही यादी तयार नाही -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, एकही आमदार मंत्री होणार नाही, तरीही आम्ही शिंदे साहेबांसोबतच आहोत. आम्ही आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. आमच्या पैकी एकाही आमदाराने मंत्रीपद मागितले नाही. मंत्रीपदाबाबतची कोणतीही यादी तयार नाही, असे केसरकर म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल काढलेले वक्तव्य रागाने काढलेले -
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत रागाने वक्तव्य काढले आहे. त्यांच्या कोणत्याही स्टेटमेंटला आम्ही उत्तर देणार नाही. आमच्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंब प्रमुख आहे, त्यांच्यावर आम्ही बोलणार नाही. घरातील वडील रागावले तर आम्ही उलट बोलतो का? आम्ही सगळे शिवसैनिकच आहोत. आम्ही सगळ्यांची समजूत काढू. संजय राऊत बोलले किंवा दुसरे कुणी बोलले तर आम्ही त्यांना उत्तर देऊ, असे केसरकर यांनी स्पष्ट सांगितले.
... तर मुख्यमंत्री जनतेची किती काळजी घेतील?
केवळ आमच्यासाठी तुम्ही (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) दररोज गोव्याला येऊ नका, आम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तुमच्याशी बोलू. दिवसभर काम आणि पुन्हा प्रवास करणे हे योग्य नाही, आरोग्य सांभाळायची गरज आहे. आमच्या 50 जणांची इतकी काळजी घेत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेची किती काळजी घेतील हे पाहा, असे केसकर म्हणाले.
शरद पवार यांनी मला खूप शिकवलं -
संजय राऊत यांना काय माहीत आहे शरद पवार आणि माझे संबंध काय आहेत? शरद पवार यांनी मला खूप शिकवलं आहे, आयुष्यात आतापर्यंत मी शरद पवार यांच्यावर टीका केली नाही. दोनच व्यक्तींना मी आदर्श मानलं एक म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे शरद पवार आहेत, असे दीपक केसरकर म्हणाले.
संजय राऊतांवर टीकास्त्र -
मी कधी माध्यमांसमोर येत नाही पण या 50 आमदारांच्या मतदार संघातील नागरिकांना समजावणे हे खूप गरजेचं आहे. संजय राऊत हे कधी नागरिकांमधून निवडून आले नाहीत. संजय राऊत तुम्ही आमच्या मतांवर खासदार झाला आहात. तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा कोणत्या आमदारांच्या मतावर निवडून येता तसे या, अशी टीका केसरकर यांनी राऊंतावर केली.