Sharad Pawar: राज्यपालांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या, शरद पवारांचा हल्लाबोल; राष्ट्रपतींनी दखल घेण्याची मागणी
Sharad Pawar On Governor Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून राष्ट्रपती, पंतप्रधानांनी याची दखल घेणे आवश्यक असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
Sharad Pawar On Governor Koshyari: राज्यपाल या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणं गरजेचं असते. सध्याच्या राज्यपालांनी अनेकवेळा अशी वक्तव्ये केली त्यावेळी आम्ही त्या पदाची गरिमा राखण्यासाठी काही बोललो नव्हतो. मात्र, आता शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यायला हवी असेही पवार यांनी म्हटले.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात राज्यपालांनी आपल्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले होते. शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक असून नवीन काळात गडकरी हे नायक असल्याचे म्हटले होते. राज्यपालांच्या वक्तव्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. विरोधकांनी राज्यपालांवर टीका करताना केंद्र सरकारने त्यांना माघारी बोलावावे अशी मागणी केली आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, आतापर्यंत राज्यपालांनी विविध वक्तव्ये केली होती. एक मर्यादा म्हणून त्यावर भाष्य केले नव्हते. आता, मात्र राज्यपालांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घ्यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली. सीमावादाच्या प्रश्नावर भाजपला आपली जबाबदारी टाळता येणार नसल्याचेही पवार यांनी म्हटले. राज्यात शेतकरी अस्वस्थ आहे अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचं आहे. परंतु सरकार याबाबत गंभीर नसल्याची टीका पवार यांनी केली. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत बोलताना पवार यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात काय चर्चा झाली,याची कल्पना नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत याबाबत चर्चा करेल असेही त्यांनी म्हटले.
राज्यपालांना त्याच कार्यक्रमात का थांबवले नाही?
शरद पवार यांनी म्हटले की, सगळा कार्यक्रम संपला आणि त्यानंतर ते बोलायला उभे राहिले. त्यामुळे उदयनराजे म्हणले की पदवी घ्यायला नको होती मात्र, कार्यक्रम संपताना बोलल्यामुळे पदवी घ्यायची की नाही याचा विषय नव्हता. त्याशिवाय राज्यपालंचे असं भाषण कानावर पडेल असं वाटलं नव्हतं
आधी बेळगाव, निपाणी महाराष्ट्राला द्या...
कर्नाटक मुख्यमंत्री यांनी वक्तव्य केलं आणि काही गावं आम्हाला हवीत अशी ते बोलले. बेळगाव निपाणी कारवार ते सोडणार असतील तर त्यांना काय द्यायचं याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र, महाराष्ट्राचा भाग पुन्हा द्यायचा नाही. त्यांनी वरून दुसरी मागणी करायची याला काही अर्थ नाही. त्यांच्या मागणीला आमचा विरोध असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
असा प्रकार कधीच झाला नाही...
राज्याच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांना त्यांच्या जवळ असणाऱ्या राज्यातील मतदानासाठी सुट्टी देण्याचा प्रकार हा 50 वर्षात कधी झाला नव्हता. गुजरातमधील निवडणुकीसाठी राज्यातील सीमेवरील जिल्ह्यात सुट्टी दिली जात असेल तर त्याठिकाणी भाजपसाठी ही निवडणूक चिंता वाढवणारी असू शकते असेही पवार यांनी म्हटले.
मध्यावधीबाबत भाष्य नाही...
मध्यावधीचे मी भाष्य केले नाही. इतर काही नेत्यांनी केले असावे. मध्यावधी निवडणूक होईल की नाही, याबाबत भाष्य करण्याच्या स्थितीत मी नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास ढळमळीत झाला असावा
माझा ज्योतिषावर विश्वास नाही. आसाम मध्ये काय घडलं ते संपूर्ण देशाला माहिती आहे. नाशिकला जाऊन ज्योतिषाला हात दाखवणं हे राज्याला नवीन नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांकडे पाहता त्यांता आत्मविश्वास ढळमळीत झाला आहे की काय, अशी स्थिती असल्याचे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.