CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला डिवचले, म्हणाले...
CM Eknath Shinde : राज्याच्या नवर्निवाचित विधानसभा अध्यक्षांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले.
CM Eknath Shinde : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेत डिवचले. विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावार बोलताना एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले. राज्यात हिंदुत्वाचे सरकार आले असून बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे सरकार स्थापन झाले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतही काम केले आहे. अनेक नेत्यांचे खटलेदेखील लढवले आहेत. अध्यक्ष सत्ताधाऱ्यांना झुकतं माप देतील अशी अपेक्षा नाही. अध्यक्षांकडून निष्पक्ष म्हणून काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले की, शिवसेना भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. हिंदुत्वाचे सरकार, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे सरकार स्थापन झाले आहे. आतापर्यंत अनेकजण विरोधातून सत्तेत जातात. मात्र, आम्ही सत्तेतून विरोधात गेलो. या घटनेची राज्यातच नव्हे तर देशातही याची नोंद होईल. माझ्यासोबत आठ ते नऊ मंत्रीदेखील सत्तेतून बाहेर पडले. एका बाजूला सत्ता, मोठी माणसं आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब, आनंद दिघे यांच्या विचारांचा सामान्य कार्यकर्ता होता. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर 50 आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे म्हटले की, काहींनी मोठे दावे केले. आमच्या संपर्कात 10 आमदार आहेत, 20 आमदार आहेत. मी त्यांना नावे सांगण्याचे आवाहन केले होते. त्यांची नावे समजली असती तर त्यांना विमानाने पुन्हा पाठवले असते. एका आमदाराला माघारी पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंड घडवून आणले. शिवसेना नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची पक्षाने शुक्रवारी हकालपट्टी केली होती.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.