Raj Thackeray : राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Raj Thackeray Meets Devendra Fadnavis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर (Sagar Banglow) भेट घेतली.
Raj Thackeray Meets Devendra Fadnavis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर (Sagar Banglow) भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. माहितीनुसार, ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची असल्याची चर्चा आहे. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून कमालीची गुप्तता
शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे पुन्हा अॅक्टीव्ह झाले आहेत. नुकतेच ते पुण्यात सभासद नोंदणीसाठी पोहोचले होते. यानंतर राज ठाकरे यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थानी भेटीसाठी पोहोचले. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी कमालीची गुप्तता ठेवली होती. यामुळे या बैठकीबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. याआधी जुलै महिन्यात राज ठाकरेंवर जेव्हा नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचले होते.
राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात कोणती चर्चा झाली?
एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याचे समजते. ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काहीतरी मोठं आणि महत्वाचं कारण असू शकतं अशी चर्चा आहे. यापूर्वी देखील या दोघांमध्ये भेट झाली होती, मात्र त्या भेटी आधी माहिती देण्यात आली होती. मात्र या भेटी संदर्भात दोघांकडून कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती देण्यात आली नाही. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांपासून कोणाच्याही भेटीगाठी करत नव्हते, मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी स्वत: सभा घेतली. तसेच त्यांच्या दौऱ्याबाबत माहितीही दिली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आल्याची चर्चा आहे.
भाजपशी जवळीक कायम ठेवणार?
मागच्या काही दिवसांत मनसेची भाजपसोबतची जवळीकता वाढलेली दिसत होती. मात्र आता राज ठाकरे ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्यानंतर तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर ही जवळीक कायम ठेवणार की 'एकला चलो रे' ची भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी अस्मितेसह हिंदुत्वाच्या मुद्याची जोड
मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या (MNS on Hindutva and Marathi) मुद्यावर आक्रमक झालेली राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसेने आता 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक' ही घोषणा ठेवली आहे. 2014 पासून मनसेच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लागला होता. त्यानंतर मनसेनं मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला. आता मनसेच्या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्वाच्या मुद्याची जोड दिल्यानं मनसेची पुढची राजकीय भूमिका आता स्पष्ट झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या