Kirit Somaiya : महाराष्ट्रात शिवसेनेची दयनीय अवस्था, याबाबत वेगळं सांगायला नको, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
Kirit Somaiyya On Sanjay Raut Arrest : किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांच्या अटक संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेची महाराष्ट्रात दयनीय अवस्था आहे.
Kirit Somaiyya On Sanjay Raut Arrest : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर रात्री ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यांदर्भात मोठं वक्तव्य केलंय, ते म्हणाले महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, केवळ भाजप राहणार. याबाबत किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेची महाराष्ट्रात दयनीय अवस्था - किरीट सोमय्या
किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेची महाराष्ट्रात दयनीय अवस्था आहे. हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राज्यात मजबूत सरकार आहे, संजय राऊत यांच्यावर 3 क्रिमिनल केसेस आहेत. त्यातून त्यांची सुटका अवघड आहे.
महाराष्ट्रातून शिवसेना संपत चालली - जे.पी. नड्डा
महाराष्ट्रात शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली असताना दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J.P. Nadda) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातून शिवसेनाही (Shivsena) संपत चालली असून केवळ भाजपच राहणार असल्याचे नड्डा यांनी म्हटले. रविवारी पाटणामध्ये भाजपच्या (BJP) कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आता देशातून संपत असल्याचे सांगत नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांवरही हल्लाबोल केला. भाजपचा लढाई वंशवाद आणि परिवारवादाशी आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा घराणेशाहीतला पक्ष आहे. तर, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी दोन हात करत आहोत. ओडिशामध्ये नवीन पटनाईक यांचा पक्ष हा एका व्यक्तीचा पक्ष आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आता संपत असून पक्षात घराणेशाही आहे. काँग्रेसदेखील आता बहिण-भावांचा पक्ष झाला असल्याची टीका नड्डा यांनी केली.
शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलं आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आली.