(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena : शिवसेनेचे 14 खासदारही बंडाच्या तयारीत? वेगळा गट म्हणून मान्यता देण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे मागणी करणार?
Shivsena : सुत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेचे 18 पैकी 14 खासदारही बंडाच्या तयारीत असल्याचं समजतं.
Shivsena : आमदारांपाठोपाठ शिवसेनेतील (Shivsena) खासदारही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात जाणार असल्याची चर्चा राजकारणात होत आहे. तर पुढील आठवड्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक होत आहे. या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली आहे.
आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेचे 18 पैकी 14 खासदारही बंडाच्या तयारीत असल्याचं समजतं. द हिंदू वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार भाजपबरोबर सत्ता स्थापन करावी यासाठी शिवसेनेचे 14 खासदार बंडाच्या तयारीत आहेत. त्यासाठी 13 किंवा 14 जुलै रोजी हे खासदार वेगळा गट म्हणून मान्यता द्यावी. यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी करणार आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या काही खासदारांनी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केलीय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज खासदारांची बैठक बोलावली असून त्यात द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा घोषित करण्याची शक्यता आहे.
आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात जाणार?
आमदारांपाठोपाठ शिवसेनेतील खासदारही एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकारणात होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली आहे. शिवसेनेतील 15 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भाने माध्यमांनी लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठोस काही सांगितले नाही. तथापि, अनेक खासदार भाजपसोबत जाण्याची मागणी करत होते. ज्यांच्याविरोधात आपण लढलो, ते मजबूत होत आहेत. आपण मात्र कमकुवत झालोय, अशी खंत खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
बैठकीचा अजेंडा काय?
पुढील आठवड्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली आहे. सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ही बैठक दुपारी 12 वाजता होणार आहे. ते म्हणाले, “या बैठकीचा अजेंडा हा 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत पक्षाच्या भूमिकेवर चर्चा करणे असेल.” याआधी शिवसेनेच्या काही खासदारांनी पक्ष नेतृत्वाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यास सांगितले होते.
काही खासदारांनी द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याची मागणी केली
यापूर्वी शिवसेनेने एनडीएशी संबंध तोडून प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी या दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. 2019 मध्ये शिवसेनेने एनडीए सोडली आणि पक्षाने आपला जुना मित्र भाजप सोडून महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित यांनी ठाकरे यांना पत्र लिहून मुर्मू यांना पक्षाने पाठिंबा देण्याची मागणी केली होती
राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे
एनडीएने आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना त्यांचे सामाजिक योगदान लक्षात घेऊन राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे.