Pune News : ठाकरे बंधू एकत्र येणार? ठाणे, मुंबईनंतर पुण्यात झळकले पोस्टर
ठाणे, मुंबईनंतर पुण्यात ठाकरे बंधू एकत्र येणार ? अशा आशयाचे पोस्टर झळकले आहे. पुण्यातील स. प. महाविद्यालय चौक, टिळक रोड, कर्वे नगर, शिवणे आणि इतर ठिकाणी झळकले आहेत.
Pune News : अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्यात बंड केल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. अनेकांनी अजित पवारांवर टीका केली तर अनेकांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. यानंतर ठाकरे बंधू यावे, या मागणीला जोर धरला. त्यांनी एकत्र येऊ महाराष्ट्रात काम करावे, या आशयाचे पोस्टर ठाणे आणि मुंबईनंतर आता पुण्यातही झळकले आहे.
पुण्यातील स. प. महाविद्यालय चौक, टिळक रोड, कर्वे नगर, शिवणे आणि इतर ठिकाणी झळकले आहेत. या पोस्टरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. त्यासोबत महाराष्ट्राचा नकाशा आणि हुतात्मा स्मारक लक्ष वेधत आहे. यात तमाम मराठी जनता ठाकरे बंधूनी एकत्र यावे अशी तीव्र मागणी करत आहे, हीच ती वेळ आहे असा मजकूर लिहला आहे. पुण्यातील महाराष्ट्र सैनिकांनी हा फलक लावला आहे. पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी मागणी केली जात आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार का ? राज ठाकरे काय म्हणाले?
ठाकरे बंधू एकत्र येणार का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. मात्र, यावर कुठलीही बैठक झाली नाही, एकत्र येण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले आहे. ते काल पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं आणि राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे काय म्हणाले?
राज्यात जे काही झालं ते किळसवाणं आहे. राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली असल्याचं राज ठाकरे म्हणाले. जनमताचा कौल तुम्ही घेतला तर प्रत्येक घरामध्ये शिव्या ऐकायला येतील दुसरे काही ऐकायला येणार नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील सत्तानाट्यावर संतापही व्यक्त केला. 'हे सगळं शरद पवारांनीच घडवून आणलं असल्याची शंका आहे. त्यात महत्वाचं म्हणजे प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ ही माणसं अजित पवारांसोबत जाणारी नाहीत. त्यामुळे ही तीन माणसं या सत्तानाट्यात संशयास्पद वाटतात. त्यात अजित पवार म्हणाले होते की, सगळ्या होर्डिंग्ज् शरद पवारांचे फोटो लावा. त्यामुळे हे सगळं अनाकलनीय असल्याचं ते म्हणाले. 'हे सत्तानाट्य अचानक घडलं नाही. याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यात ती आता सगळ्या महाराष्ट्रासमोर आली',असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :